सिडकोच्या कार्यकारी अभियंत्याला लाच घेताना अटक
नवी मुंबई, ता. २१ (वार्ताहर) : ठेकेदाराने पूर्ण केलेल्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी दीड लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून त्यापैकी ३० हजार घेताना सिडकोचा कार्यकारी अभियंता कल्याण पाटील याला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. विशेष म्हणजे पाटील याने यापूर्वी तीन बिले मंजूर करण्यासाठी एक लाख २० हजार रुपये स्वीकारले होते.
तक्रारदार ठेकेदाराने कळंबोली ब्रिज व खारघर रेल्वेस्थानक येथील ब्रिजची कामे पूर्ण करून बिल सादर केले होते. यावेळी पाटील याने मागील तीन बिलांचे बाकी राहिलेले ३० हजार रुपये व चालू नवीन तीन बिलांचे दीड लाख रुपये दिल्यानंतरच त्याच्या बिलावर सही करणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे ठेकेदाराने १८ जानेवारीला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार केली होती. त्यानंतर पाटील याने मागील बिलातील राहिलेली ३० हजारांची रक्कम घेऊन सीबीडीतील एमजीएम हॉस्पिटलजवळ बोलावले होते. त्याठिकाणी कारमधून आलेल्या पाटील याने ठेकेदाराकडून ३० हजारांची रोख रक्कम घेतल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला पकडले. त्यानंतर सीबीडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.
चौकट
यापूर्वीही घेतली होती लाच
तक्रारदार ठेकेदाराने कळंबोळी ब्रिज, खांदा कॉलनी व खारघर रेल्वेस्थानकाची कामे पूर्ण केली होती. या तीन बिलांचे सात लाख ५६ हजारांचे बिल मंजूर करण्यासाठी कार्यकारी अभियंता कल्याण पाटील याने दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तडजोड झाल्याने पाटील याने दीड लाख रुपयांची मागणी केली होती. त्यावेळी ठेकेदाराने पाटील यांना एक लाख २० हजार रुपये दिल्यानंतर बिल मंजूर केले होते.