वरिष्ठ महाविद्यालये लवकरच खुली होणार
उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव सादर
मुंबई, ता. २१ : राज्यातील विद्यापीठे आणि वरिष्ठ महाविद्यालये सुरू करण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने तयार केलेला प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावाला संमती मिळताच राज्यातील सर्व विद्यापीठे, वरिष्ठ महाविद्यालये ऑफलाईन सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ३ जानेवारीपासून सर्व विद्यापीठे आणि वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये ऑनलाईन शिक्षण सुरू करण्यात आले होते. तसेच सर्व परीक्षाही ऑनलाईन सुरू ठेवण्याचे आदेश उच्च शिक्षण विभागाने दिले होते. मात्र, राज्यातील अनेक भागांत कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरत असल्याने पुन्हा विद्यापीठे आणि वरिष्ठ महाविद्यालये सुरू करण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज एक आढावा बैठक घेतली. या बैठकीत राज्यात कोविड-१९ चा प्रादुर्भावाचा आढावा घेऊन त्यासाठीचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आला आहे. त्यावर पुढील दोन दिवसांत निर्णय होण्याची शक्यता असल्याने वरिष्ठ महाविद्यालये लवकरच सुरू होणार आहेत.
सामंत यांनी राज्यातील महाविद्यालये सुरू करण्यासाठी राज्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन प्रस्ताव तयार करण्यात आला असल्याची माहिती दिली. तसेच राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा या ऑनलाईन पद्धतीने सुरू आहेत, त्या परीक्षा १५ जानेवारीपर्यंत तशाच सुरू ठेवण्यात येणार आहेत. त्यात तूर्तास कोणताही बदल केला जाणार नाही, मात्र त्यानंतर परीक्षा ऑफलाईन घेण्यासाठी निर्णय घेतला जाईल, अशी माहिती सामंत यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
चौकट ------
वसतिगृह लवकरच सुरू
राज्यातील सामाजिक न्याय आणि उच्च शिक्षण, विद्यापीठे यांच्या अंतर्गत असलेली सर्व वसतिगृहे लवकरच सुरू होणार आहेत. यासाठीचे संकेत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले.