कोकण रेल्वेवर विद्युतीकरणाला वेग
रत्नागिरी ते कारवार विभागात विद्युतीकरण अंतिम टप्प्यात
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : कोकण रेल्वे मार्गावर रत्नागिरी ते कारवार या विभागात विद्युतीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे येत्या काळात डिझेल इंजिन कालबाह्य होणार असल्याचे बोलले जात आहे.
भारतीय रेल्वे मार्गावरील अनेक ठिकाणी विद्युतीकरणाचे काम सुरू आहे. भारतातील सर्वांत मोठे रेल्वे विद्युतीकरणाचे काम सुरू आहे. मागील वर्षी रोहा ते रत्नागिरी स्थानकापर्यंत विद्युतीकरण पूर्ण झाले; तर कारवार ते ठोकूर येथील विद्युतीकरणाची कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. उर्वरित रत्नागिरी ते कारवार या विभागातील काम अंतिम टप्प्यात आहे. बोगद्यातील विद्युत यंत्रणा, केबल टाकण्याची कामे सुरू आहेत. सध्या एकूण ८७ टक्के काम पूर्ण झाले आहे. फेब्रुवारीत हे काम संपूर्ण होण्याचा आशावाद कोकण रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे.
...
विद्युतीकरणासाठी १०० कोटी
कोकण रेल्वेच्या दुहेरी मार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. अनेक ठिकाणी दुहेरी मार्गाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. तसेच काही रेल्वे स्थानकांदरम्यानही दुहेरी मार्गाचे काम सुरू आहे. त्यामुळे कोकण रेल्वेचा प्रवास वेगवान होणार आहे. तसेच या विद्युतीकरणामुळे कोकण रेल्वेचे २०० कोटी रुपये वाचणार आहेत. सध्या डिझेलवर रेल्वेला ३०० कोटी रुपयांचा खर्च होत आहे; मात्र आता विजेवर गाड्या धावण्यासाठी १०० कोटी रुपये खर्च लागण्याची शक्यता आहे.
...
पिगबॅकसाठी डिझेल इंजिन
कोकण रेल्वेचा मार्ग जंगलातून गेला आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांमुळे विद्युत प्रवाह खंडित (वायर ट्रिपिंग) होण्याचे प्रकार होऊ शकतात. पुरवठा खंडित झाला की गाडी १०० मीटरमध्ये जाऊन थांबते. अशी ठिकाणे निश्चित करून तेथे आपत्कालीन यंत्रणा ठेवणे आवश्यक आहे; तर दुसऱ्या बाजूला एखादे इंजिन बंद पडल्यास पिगबॅकसाठी बॅकअप डिझेल इंजिन तयार ठेवणे आवश्यक असल्याने यावर कोकण रेल्वे प्रशासनाने कामे सुरू केली आहेत.
...
आजवरची कामे
- एकूण ७४१ कि.मी. अंतरापैकी ४४३ कि.मी. अंतराचे विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे.
- रोहा ते रत्नागिरी २०४ कि.मी. आणि कारवार ते ठोकूर २३९ कि.मी. अंतराचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे.
- या कामासाठी एकूण एक हजार २८७ रुपये खर्च अपेक्षित आहे.