वडिलांना बरे करण्यासाठी
भोंदूबाबाने मागितली सोन्याची जीभ
रामनगर पोलिस जळगावला रवाना
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २५ : डोंबिवलीतील एका कुटुंबाला जळगावच्या भोंदूबाबाने ३२ लाखाला गंडा घातला आहे. याप्रकरणी पवन पाटील या भोंदूबाबाला रामनगर पोलिसांनी अटक केली आहे. फिर्यादी यांच्या वडिलांना बरे करण्यासाठी पवनने त्यांना देवाला सोन्याची जीभ ओवाळून टाकावी लागेल, अशा भूलथापा दिल्या असल्याचे उघड झाले आहे. या घटनेचा सखोल तपास करण्यासाठी रामनगर पोलिसांचे एक पथक जळगावला रवाना झाले आहे.
डोंबिवलीतील महिलेच्या तक्रारीवरून पवन पाटील याच्याविरोधात गुन्हा दाखल करीत रामनगर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या घटनेचा तपास रामनगर पोलिसांनी सुरू केला आहे. या पथकाने पवन याचे बॅंक खाते गोठवले असून त्यामध्ये १० ते ११ लाख रुपये असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच पथकाने आठ ते १० तोळे सोनेदेखील हस्तगत केले असल्याची माहिती रामनगरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन सांडभोर यांनी दिली.
फिर्यादी यांची नोकरी गेली होती, त्यात त्यांच्या वडिलांची तब्येत ठीक नव्हती. पवन याने वडिलांना बरे करण्यासाठी देवाला सोन्याची जीभ ओवाळून टाकावी लागेल, असे फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांना सांगितले. तसेच त्यासाठी घरात होमहवन करण्यास सांगितले. ही सोन्याची जीभ सव्वापाच ग्रॅमची मागितली होती, अशी माहिती तपासात पुढे आली आहे.
चौकट
आरोपीच्या मित्रांमुळेच भांडाफोड
आरोपीचा मित्र राकेश पाटील याने फिर्यादी यांना फोन करून हा भोंदूबाबा असून त्याच्यावर विश्वास ठेवू नका असे सांगितले होते. फिर्यादींनी त्यानुसार माहिती काढली असता आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.