आदित्य ठाकरेकडून पनवेलच्या विद्यार्थिनीची दखल
शाळेचे नरमाईचे धोरण; परीक्षेस बसायला अनुमती
नवीन पनवेल, ता. १ (वार्ताहर) ः शहरातील सेंट जोसेफ शाळेत इयत्ता दहावीत शिकणाऱ्या गुंजनचे काही महिन्यांचे शैक्षणिक शुल्क बाकी होते. त्यामुळे शाळेने सराव परीक्षेसाठी बसता येणार नाही असे सांगितले होते. गुंजनचे वडील नसून घरची परिस्थिती हालाखीची आहे.
आई एकटी कमावती असल्याने शुल्कात सवलत देण्याची मागणी त्यांनी केली होती. शाळेनेही फी मध्ये सवलत देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र फी भरली नाही तर दहावीच्या सराव परीक्षेला बसता येणार नसल्याचे शाळेच्या मुख्याध्यापकांनी अचानक सांगितले. खूप विनवणी करूनही शाळा जुमानत नसल्याने शेवटी पालकांनी युवासेना प्रमुख, पर्यटन तथा पर्यावरण मंत्री यांना मेल करून मदत मागितली.
रायगड व नवी मुंबई येथील काम पाहणारे युवासेनेचे सहसचिव रूपेश पाटील यांना युवासेना कार्यकारणी सदस्य साईनाथ दुर्गे यांच्यामार्फत पालकांची भेट घेत समस्या जाणून घेतली. तसेच रायन शाळेच्या प्रमुख आलीस यांच्याकडेही याबाबत विचारणा केली. शिवाय प्रश्न तातडीने न सोडविल्यास आंदोलनाचा इशारा दिला.
दुसऱ्या दिवशी सकाळीच शाळेने पालकांना बोलावून परीक्षेचा फॉर्म भरून घेतला व फी बाबत सवलत युवासेनेची मागणी मान्य केली. शाळा किंवा महाविद्यालयात विद्यार्थांना फीसाठी त्रास दिला जात असल्यास तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन रूपेश पाटील यांनी केले आहे.