ठाणे महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजले
निवडणूक आयोगाचे प्रभागांच्या सीमा निश्चितीसाठी पालिकेला पत्र
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २९ : ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकांचे बिगुल वाजण्यास सुरुवात झाली आहे. त्यात राज्य निवडणूक आयोगाकडून ठाणे पालिकेला प्रभागांच्या सीमा निश्चित करण्यासाठी पत्र दिले आहे. यामध्ये सीमा निश्चित करण्यासंदर्भातील कार्यक्रम देण्यात आला आहे. १ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीत पाच टप्प्यांत हा कार्यक्रम पूर्ण करावयाचा असून सूचना आणि हरकतींवर सुनावणी घेतल्यानंतर २ मार्चला विवरण पत्र निवडणूक आयोगाला सादर करावे लागणार आहे. त्यानंतरच खऱ्या अर्थाने विद्यमान नगरसेवक, तसेच इच्छुक उमेदवार कामाला लागणार आहेत.
आगामी ठाणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागरचना कशा पद्धतीने होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अनेक विद्यमान आणि इच्छुक उमेदवारांनी प्रभागांच्या सीमा कशा पद्धतीने निश्चित होणार, यावर आपली राजकीय गणिते आखली आहेत. बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार ठाणे महापालिकेने प्रारूप प्रभागरचनेचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे सादर केला आहे. त्यानुसार प्रभाग संख्या, एकूण लोकसंख्या, सदस्यसंख्या निश्चित करण्यात आली. ओबीसी प्रवर्गाच्या आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. ओबीसी प्रवर्गाची लोकसंख्या सोडून अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींची लोकसंख्यादेखील निश्चित करण्यात आली आहे.
ओबीसी प्रवर्गातील आकडेवारी ही संबंधित मागासवर्ग आयोगाला सादर करण्यात येणार आहे. त्यांच्या शिफारशी या राज्य निवडणूक आयोगाला सादर करण्यात येणार आहेत; मात्र त्यांच्या शिफारशी येण्यास विलंब लागणार असल्याने ठाणे पालिका क्षेत्रातील प्रभागांच्या सीमा निश्चित करण्यासंदर्भातील पत्र राज्य निवडणूक आयोगाने दिले आहे.
चौकट
प्रभाग ४४ मधून चार सदस्य
ठाणे महापालिकेची निवडणूक ही तीन सदस्यीय पद्धतीने होणार असली, तरी एकूण ४७ प्रभागांपैकी प्रभाग क्रमांक ४४ हा सर्वाधिक मोठा प्रभाग असून या प्रभागाची लोकसंख्या तब्बल ५७ हजारांच्या घरात आहे. त्यामुळे या ठिकाणी तीन सदस्यांच्या ऐवजी चार सदस्य निवडून जाणार आहेत. इतर प्रभागांमधील लोकसंख्या ही ३५ हजारांपासून ४६ हजारांच्या घरात आहे; मात्र प्रभाग क्रमांक ४४ हा जास्त लोकसंख्येचा प्रभाग असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
चौकट
एकूण प्रभाग संख्या ४७
एकूण सदस्य संख्या- १४२
अनुसूचित जाती- १०
अनुसूचित जमाती- ३
सर्वसाधारण- १२९
प्रभाग वाढ- १४
सदस्य संख्यावाढ- १२
महिलांसाठी आरक्षित जागा- ७१
अनुसूचित जाती- ५
अनुसूचित जमाती- २
सर्वसाधारण- ६४