
विरार : पाणीपट्टी वसुलीसाठी पालिकेने कंबर कसली; थकबाकीदारांवर कारवाईचे आदेश
विरार : वसई-विरार पालिकेने (vasai-virar municipal) पाण्याच्या अनेक योजना सुरू केल्या असल्या तरी पाणीपट्टी वसुलीत पालिका मागे राहिली आहे. त्यामुळे अनेक योजनांवर परिणाम होत आहे. म्हणून पालिकेने आता पाणीपट्टी वसुलीसाठी (Water bill connection) विशेष मोहीम हाती घेतली आहे. पाणीपट्टी न भरणाऱ्यांवर कारवाईचे आदेश (action against defaulters) आयुक्तांनी दिले आहेत. वसई-विरार पालिका हद्दीतील नागरिकांना सद्यस्थितीत धामणी (सूर्या), पेल्हार आणि उसगाव या तीन धरणांतून एकूण २३० एमएलडी पाणीपुरवठा होतो.
हेही वाचा: उत्पादनशुल्क वाढीचा ‘आहार’कडून निषेध
वसई-विरार महानगरपालिका हद्दीत झपाट्याने नागरीकरण होत असल्याने पाण्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. यासाठी पालिकेने आतापर्यंत एकूण ५२ हजार ४५ नळजोडण्या पालिकेच्या नऊ प्रभाग समिती अंतर्गत वितरित केल्या आहेत. यामधून नागरिकांना पाण्याचा पुरवठा केला जातो. दरवर्षी या पाणीपट्टी धारकांकडून पाणीपट्टी वसूल केली जाते. मात्र २०२१-२२ या चालू वर्षात केवळ २८ टक्केच पाणीपट्टी वसुली झाल्याचे समोर आले आहे.
एकीकडे मालमत्ता कराने २५८ हून जास्त कोटींचा टप्पा पार केला असून दुसरीकडे पाणीपट्टी कराची केवळ २२ कोटी वसुली झाल्याने नव्या योजनांसाठी पैसे कसे उभे करायचे याचा पेच प्रशासनापुढे पडला आहे. शहरात पाण्याची कमतरता नाही, मात्र पाण्याचे योग्य नियोजन नसल्याने ते नियोजन करणे गरजेचे आहे. पाणीपट्टी कराची वसुली झाली नाही तर त्याचा परिणाम भविष्यात महापालिकेच्या प्रकल्पांना शासनामार्फत मान्यता देण्यास आणि अनुदान उपलब्धतेवर होण्याची शक्यता पालिकेने वर्तविली आहे.
यासाठी पालिकेने पाणीपट्टी कराच्या वसुलीसाठी कंबर कसली आहे. यासाठी पालिकेने विशेष मोहीम हाती घेतली असून यामार्फत सर्व प्रभाग समिती स्तरावर १०० टक्के वसुलीचे आदेश दिले आहेत. या विशेष मोहिमेमध्ये पाणीपट्टी भरण्यासाठी जाहीर आवाहन करण्यात येत असून दवंडी, वर्तमानपत्रात जाहिरात तसेच सिनेमागृहात जाहिरात देण्यास सुरुवात केली आहे. या उपायानंतरही पाणीपट्टी न भरणाऱ्या नागरिकांचा पाणीपुरवठा देखील खंडित करण्यात येणार असल्याचे पालिकेने सांगितले. त्यामुळे पाणीपट्टी वेळेत भरण्याचे आवाहन पालिकेने नागरिकांना केले आहे.
येत्या दोन महिन्यांत १०० टक्के वसुलीचे आमचे उद्दिष्ट आहे. पाणी देयके देखील पालिकेने वेळेवर दिलेली होती. त्यामुळे नागरिकांनी पाणीपट्टी भरण्यास सहकार्य करावे, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल.
- अनिलकुमार पवार, आयुक्त तथा प्रशासक, वसई-विरार पालिका.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..