
मुंब्रा : ‘लेडी पोलिस सिंघम’साठी नागरिक रस्त्यावर
कळवा, ता. ३१ (बातमीदार) : बनावट कागदपत्रांच्या आधारे एमएमआरडीएची घरे विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करणाऱ्या मुंब्रा पोलिस ठाण्याच्या लेडी सिंघम कृपाली बोरसे यांची ठाण्यात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या या बदलीमागे हा घोटाळाच असल्याची चर्चा सुरू असताना आता मुंब्रावासीय त्यांची बदली रोखण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. कर्तबगार सहाय्यक पोलिस निरीक्षक कृपाली बोरसे यांची बदली थांबवण्यात यावी, या मागणीसाठी मुंब्र्यात मानवी साखळी करण्यात आली.
मुंब्रा पोलिस ठाण्यात गेल्या तीन ते चार महिन्यांपूर्वी हजर झालेल्या महिला सहायक पोलिस निरीक्षक कृपाली बोरसे यांनी कोरोनाच्या या कालावधीत अनेक गुन्हे उघडकीस आणले. महिलांचे गुन्हे हाताळताना त्याना विश्वासात घेऊन त्याना धीर दिला. कोरोनाचे निर्बंध पाळताना रात्रीच्या बंदीच्या वेळा काटेकोर पाळून रात्री घडणाऱ्या गुन्ह्यावर अंकुश बसविला. तसेच, रात्री रस्त्यावर फिरणाऱ्या निराधार व अनाथ मुलांना आधार दिला. मुंब्र्यात ड्रग्स व अन्य नशा येणाऱ्या पदार्थांची तस्करी थांबविण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे अनेक तरुण मुले नशामुक्त झाले. त्यामुळे अनेक पालकांची चिंता कमी झाली होती. महिला व मुलींवरील अत्याचार कमी झाले होते. अशा चांगल्या काम करणाऱ्या व अल्पावधीतच मुंब्र्यात गुन्हेगारांवर वचक बसविणाऱ्या कर्तबगार पोलिस अधिकाऱ्यांची अचानक बदली झाल्याने मुंब्रावासीयांना मोठा धक्का बसला. त्यांची बदली झाल्याचे येथील नागरिकांना समजल्यावर त्यानी रविवारी रस्त्यावर उतरून त्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरून हातात बॅनर घेत ‘बोरसे मॅडम परत या, मॅडमची बदली रद्द करा’ अशा घोषणा देऊन रस्त्याच्या कडेला मानवी साखळी तयार केली.
ही बदली अचानक झाली आहे. याबद्दल मला आधी कल्पना नव्हती. मी नव्या ठिकाणीही कर्तव्य व निष्ठेने काम करेन. - कृपाली बोरसे, सहायक पोलिस निरीक्षक पोलिस अधिकारी
बोरसे मॅडम मुंब्र्यात आल्यावर त्यांनी अनेक गुन्हे उघडकीस आणले. तरुणांना नशामुक्त केले. त्यामुळे त्यांची बदली राजकीय दाबावातून झाली आहे. ती रद्द करावी. - सायरा शेख, मुंब्रा
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..