बदलापुरात पोलिसांची संख्या अपुरी
चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याची तक्रार
बदलापूर, ता. ३१ (बातमीदार) ः बदलापूर शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. सद्यस्थितीला शहराची लोकसंख्या अंदाजे तीन लाख इतकी असून, या लोकसंख्येच्या सुरक्षेसाठी व शहरात शांतता व सुव्यवस्था टिकवून ठेवण्याची भूमिका बजावणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या मात्र अपुरी ठरत आहे. तीन लाख लोकसंख्येसाठी बदलापूर पूर्वेकडील पोलिस ठाण्यात १२२ कर्मचाऱ्यांची मंजुरी असून फक्त १०५ कर्मचारी सेवा बजावत आहेत; तर पश्चिमेला ५० कर्मचाऱ्यांची मंजुरी असून ७० कर्मचारी सेवेत आहेत. मात्र पोलिस कर्मचाऱ्यांची ही संख्या लोकसंख्येच्या तुलनेत अपुरी पडत आहे. एकीकडे ही स्थिती असताना दुसरीकडे शहरात चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.
दिवसाढवळ्यासुद्धा बंद फ्लॅटचे दरवाजे तोडून चोऱ्या होत आहेत. यावर उपाय म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र प्रदेश चिटणीस कालिदास देशमुख यांनी शहरातील पोलिस कर्मचारीवर्ग वाढविण्यासाठी, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेऊन त्यांना या संदर्भात निवेदन सादर केले.
झपाट्याने वाढणाऱ्या बदलापूर शहरात आता चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. दिवसाढवळ्यासुद्धा आता चोरांचा शहरात सुळसुळाट झाला आहे. शहरातील पोलिस कर्मचारी अपुरे पडत आहे. यासंदर्भात त्यांनी नुकतीच गृहमंत्र्यांची भेट घेतली. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
- कालिदास देशमुख, प्रदेश चिटणीस, राष्ट्रवादी, बदलापूर