विटावा महोत्सवात गर्दी
कोरोनाचे नियम धाब्यावर
कळवा, ता. ३१ (बातमीदार)ः एकीकडे कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी उद्याने बंद ठेवून व अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये गर्दी होऊ नये म्हणून ठाणे महापालिका प्रशासनाने नियमांचे कठोर निर्बंध लादले आहेत. मात्र विटाव्यातील पऱ्याच्या मैदानावर गेले काही दिवसांपासून विटावा महोत्सवात गर्दी होत असून येथे कोरोना नियमांचा भंग केला जात आहे. येथे होणाऱ्या गर्दीत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे. तसेच अनेक नागरिक विनामास्क या महोत्सवात फिरताना दिसून येत आहेत.
ठाणे शहरातून कोरोनाचे लाट अजून ओसरली नसताना कळवा, विटावा, गणपती पाडा, दिघा परिसरातील हजारोंच्या संख्येने महिला पुरुष लहान मुलांसह रोज संध्याकाळी रात्रीपर्यंत या महोत्सवात सहभागी होत आहेत. तसेच विविध वस्तू विक्रेते, पाळणे व खेळांची दुकाने थाटली आहेत. त्यामुळे येथे नागरिकांची प्रचंड गर्दी होते आहे. महापालिकेने आखलेल्या कोरोना निर्बंधाच्या नियमावलीत पाचपेक्षा जास्त नागरिकांनी एकत्र येऊ नये, अंत्यविधीसाठी २० ते २५ लोकांची व लग्नासाठी ५० लोकांना फक्त उपस्थिती, असे निर्बंध असताना तसेच या आठवड्यात येणाऱ्या माघी गणेशोत्सव उत्सवालाही बंदीचे सावट असताना शहरांमध्ये सुरू असलेल्या अशा महोत्सवाला परवानगी कशी दिली, असा प्रश्न जागरूक नागरिक विचारत आहेत.
प्रशासनाचा दुजाभाव
महोत्सवातून महापालिका प्रशासनाला मनोरंजन कर मिळतो. म्हणून प्रशासन कोरोनाची नियमावली धाब्यावर बसवून अशा महोत्सवाला परवानगी देते. मात्र गेले काही दिवस उद्याने बंद असल्याने सकाळ व संध्याकाळी मोकळा श्वास घेण्यासाठी फिरायला जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिलांची या नियमावलीमुळे कोंडी होताना दिसते आहे.
उद्याने सुरू करण्याची मागणी
कळवा परिसरात असलेल्या नक्षत्र गार्डनमध्ये सकाळ व संध्याकाळी फिरायला व व्यायाम करायला येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी उद्यान सुरू करावे, अशी मागणी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रमोद सायखेडेकर यांनी प्रशासनाकडे केली आहे.
विटावा महोत्सवाला महापालिकेने परवानगी दिलेली नाही. या मैदानात माघी गणेशोत्सवाच्या मंडपासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे सुरू असलेल्या महोत्सवावर तातडीने कारवाई करण्यात येईल.
- समीर जाधव, सहायक आयुक्त, कळवा प्रभाग समिती.