विकासकामांसाठी दबावतंत्राचा वापर करा
अंबरनाथमध्ये राष्ट्रवादीच्या मेळाव्यात नेत्यांचे आवाहन
अंबरनाथ, ता. ३१ (बातमीदार) : राज्यात महाविकास आघाडी सत्तेत असताना अंबरनाथ शहरातील विकासकामांमध्ये दुजाभाव होत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पालिका प्रशासनावर दबावतंत्राचा वापर करून विकासकामे करण्यासाठी पाठपुरावा करावा, असा सल्ला राष्ट्रवादीच्या नेत्यांनी येथे दिला.
अंबरनाथ राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सदाशिव पाटील यांच्या नेतृत्वाखाली शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष प्रमोद बोऱ्हाडे यांनी कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. यावेळी प्रदेश प्रवक्ते महेश तपासे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील, प्रदेश सरचिटणीस किसनराव तारमळे, जिल्हा अध्यक्ष दशरथ तिवरे, महिला अध्यक्षा विद्या वेखंडे, सचिन पाटील, कमलाकर सूर्यवंशी यांच्यासह माजी आमदार पप्पू कलानी, उल्हासनगरच्या माजी महापौर पंचम कलानी उपस्थित होते.
शहरात विकासकामे होत असताना प्रशासनाकडून राष्ट्रवादीच्या प्रभागात दुजाभाव होत असल्याचा सूर धनंजय सुर्वे यांनी उपस्थित केला होता. याची दखल घेत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रलंबित विकासकामांची यादी तयार करावी. त्या कामांच्या पूर्ततेसाठी नगरपालिकेत अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा करावी. न्याय मिळाला नाही तर आंदोलने तसेच दबावतंत्राचा अवलंब करावा. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडून निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी दिले. शहर विकासकामांमध्ये सर्वांना समान न्याय मिळालाच पाहिजे, यासाठी पक्षाच्या युवकांनी प्रशासनाला जाब विचारावा, असा सल्ला जिल्हा युवक अध्यक्ष सुधीर पाटील यांनी दिला. नरेंद्र काळे, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष गणेश गायकवाड, पूनम शेलार, सूर्यकांत जाधव आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.