मिरा-भाईंदरमधील कचरा प्रकल्पाला विरोध
स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून प्रायोगिक तत्त्वावर प्रकल्प
भाईंदर, ता. ३१ (बातमीदार) : कचरा प्रक्रियेचे विकेंद्रीकरण करण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून मिरा-भाईंदर महापालिका स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून प्रायोगिक तत्त्वावर कचरा प्रकल्प सुरू करणार आहे. मिरा रोड येथील इंद्रलोक परिसरात हा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. मात्र प्रकल्प सुरू होण्याआधीच त्याला स्थानिक पातळीवर विरोध सुरू झाला आहे.
उत्तन येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पाव्यक्तिरिक्त महापालिका शहरात ठिकठिकाणी बायोगॅस प्रकल्प देखील सुरू करणार आहे. यातील दोन प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर सुरू देखील झाले आहेत. आता त्याचे पुढचे पाऊल म्हणून `मेकिंग द डिफरन्स` चॅरिटबल ट्रस्ट या संस्थेला मिरा रोड येथील इंद्रलोक परिसरात कचरा प्रकल्पासाठी जागा देण्यात येणार आहे. सध्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मैदानासमोर असलेल्या शाळेचे आरक्षण असलेल्या जागेतील १० हजार चौरस फुटांची जागा या संस्थेला देण्यात येणार आहे. प्रकल्पासाठी येणारा सर्व खर्च, मनुष्यबळ, वीज, पाणी आदींचा खर्च ही संस्था करणार आहे.
या ठिकाणी केवळ सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया होणार आहे. तसेच संस्थेच्या मार्फत आसपासच्या परिसरातील रहिवासी इमारतींचे कचरा विलगीकरण, कचऱ्याची विल्हेवाट, कचरा प्रक्रिया आदी संदर्भात माहिती देऊन जनजागृती करण्यात येणार आहे. परिसरातील सुका कचरा गोळा करण्याचे कामही ही संस्थाच करणार असल्याने महापालिकेचा कचरा वाहतुकीसाठी लागणाऱ्या वाहनांवर होणारा खर्च वाचणार आहे. या प्रकल्पाला नुकताच पार पडलेल्या महासभेत मान्यता देण्यात आली आहे. मात्र प्रकल्पाचे काम सुरू होण्याआधीच या प्रकल्पाला स्थानिक पातळीवर विरोध सुरू झाला आहे.
-----
पालिकेने शाळा उभारावी
शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविका स्नेहा पांडे यांनी या प्रकल्पाला जोरदार विरोध केला आहे. प्रकल्प ज्या जागेवर उभा रहाणार आहे ती जागा शाळेसाठी आरक्षित आहे. त्यामुळे महापालिकेने या ठिकाणी शाळाच उभारावी. कचरा प्रकल्प सुरू झाल्यास या ठिकाणी दुर्गंधी पसरून प्रदूषण होणार आहे. त्यामुळे रहिवाशांना याठिकाणी रहाणे शक्य होणार नाही. या प्रकल्पाला रस्त्यावर उतरून विरोध केला जाईल, असा इशारा स्नेहा पांडे यांनी दिला आहे. पांडे यांच्या नेतृत्वाखाली काही रहिवाशांनी प्रकल्पाच्या नियोजित जागेवर जाऊन निदर्शनेही केली आहेत.
हा प्रकल्प निव्वळ प्रायोगिक तत्त्वावर आहे. या ठिकाणी केवळ सुक्या कचऱ्यावरच प्रक्रिया होणार आहे. त्यामुळे दुर्गंधी अथवा प्रदूषण अजिबात होणार नाही. ही बाब स्थानिक रहिवाशांना समजावून सांगून त्यांची समजूत काढण्यात येईल.
- रवी पवार, उपायुक्त, मिरा-भाईंदर महापालिका.