हत्येच्या आरोपातून
मायलेकाची मुक्तता
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : ‘स्क्रिझोफ्रेनिया’ या मनोविकाराच्या प्रभावाखाली येऊन एकाची हत्या केल्याचा आरोप असलेला ५६ वर्षांचा आरोपी आणि त्याच्या आईला मुंबई उच्च न्यायालयाने आरोपमुक्त केले. आपण काही बेकायदा कृती करीत आहोत, हेच त्याला आजारामुळे कळले नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.
न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. मिलिंद जाधव यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर सुनावणी झाली. आरोपी धनंजय पोरे आणि त्याची आई शंकुतला यांची न्यायालयाने सुटका केली. पोरे मागील दहा वर्षांपासून ‘स्क्रिझोफ्रेनिया’ मनोविकाराने त्रस्त आहे आणि त्याच्या वडिलांनाही हाच आजार होता, असे न्यायालयात सांगण्यात आले. याबाबत वैद्यकीय कागदपत्रे आणि अहवाल दाखल करण्यात आला होता. तसेच तीन शेजारी आणि चार डॉक्टरांची साक्ष बचाव पक्षाने नोंदविली आहे. न्यायालयाने हा युक्तिवाद मान्य केला. पोरेने मानसिक आजारामुळे कृती केली आहे. त्याला त्याचा परिणाम आणि गुन्हेगारी स्वरूपाची कल्पना नव्हती, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे.
...
सत्र न्यायालयातही निर्दोष
अभियोग पक्षाच्या दाव्यानुसार पोरे आणि पीडित पद्माकर हे एका देवळाबाहेर नारळविक्रीचा व्यवसाय करत होते. त्यावरून त्यांची वादावादी होत होती. जुलै २००२ मध्ये पोरे याने पद्माकरवर चाकूने हल्ला केला. यावेळी त्याची आई आणि पद्माकरची पत्नीही हजर होते. या हल्ल्यात पद्माकर गंभीर जखमी झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी याबाबत पोरे आणि त्याच्या आईला अटक केली होती. न्यायालयाने आईला पुराव्याअभावी दोषमुक्त केले. यापूर्वी सत्र न्यायालयानेही दोघांना निर्दोष जाहीर केले होते. राज्य सरकारने याविरोधात उच्च न्यायालयात अपील याचिका केली होती. न्यायालयाने याचिका नामंजूर केली.
...