कोरोनाविषयक मानसिक चिंता मिटली
जे. जे. रुग्णालयातील समुदेशन कक्षात रुग्णसंख्येत घट
भाग्यश्री भुवड ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : कोरोना संसर्गातून बरे झालेले, परंतु त्यातून आलेल्या मानसिक तणावावर उपाय शोधण्यासाठी समुपदेशन कक्षात येणारे रुग्ण सध्या कमी झाले आहेत. हे प्रमाण डिसेंबर २०२१ पासून झपाट्याने कमी होत असल्याची माहिती जे. जे. रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागातील मनोविकृती विभागप्रमुख डॉ. वनश्री पाटील यांनी सोमवारी दिली.
पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत कोरोना संसर्ग काळात मानसिक तणाव ही मोठी समस्या निर्माण झाली होती. तिसऱ्या लाटेत मानसिक संतुलनाशी निगडित प्रश्न घेऊन एकही रुग्ण आला नाही. समुपदेशनासाठी येणाऱ्या रुग्णांमध्ये सर्वच जण मानसिक तणावाशी निगडित नव्हते. काहींना शारीरिक व्याधीविषयक चर्चा हवी होती. त्याच वेळी काहींना मानसिक समस्याही होत्या. आता त्यांचे प्रमाण घटले आहे, असे डॉ. पाटील यांनी सांगितले. बाह्यरुग्ण विभागात किमान १५० रुग्ण दाखल होत होते. आता ही संख्या कमी झाली आहे. सध्या रोज सरासरी १२० ते १२५ रुग्ण येत आहेत. दाखल रुग्णांची संख्या ३० वरून थेट ४ पर्यंत खाली आल्याचे त्या म्हणाल्या.
...
समुपदेशनादरम्यान...
- कोरोनासोबत कसे जगायचे, कोरोनाचा नेमका प्रसार कसा होतो, या दोन्ही प्रश्नांशी संबंधित रुग्ण बाह्यरुग्ण विभागात येत होते. काहींना तर कोरोना जाणारच नाही, ही भीती सतावत होती. म्हणजे तो जीवनाचा अविभाज्य घटक असल्याचे अनेकांना वाटू लागले होते. काहींना तशी स्वप्ने पडू लागली होती, असा अनुभव डॉक्टरांनी ‘सकाळ’कडे कथन केला.
- ‘ओमिक्रॉन’चा सौम्य संसर्ग झपाट्याने संक्रमित झाला. मुंबईत दैनिक रुग्णांची संख्या २५ हजारांहून अधिक नोंदली गेली होती. त्यामुळे काही काळ भीतीचे वातावरण तयार झाले होते. मात्र, मृत्यूचे प्रमाण कमी असल्याने ही भीती काही काळानंतर कमी होत गेली. नागरिकांमध्ये आता लक्षणांबद्दल जागृती झाली आहे. उपचारांची माहिती त्यांनी करून घेतली आहे. त्यामुळे कोरोनातून बरे झालेल्या नागरिकांमधील मानसिक समस्या कमी झाल्या आहेत.
...
दुसऱ्या लाटेतील स्थिती
- एप्रिल २०२१ मध्ये दुसऱ्या लाटेतील अभ्यासात जवळपास ६० ते ७० टक्के रुग्ण मानसिक तणावाखाली
- अनेकांना आर्थिक समस्या, कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या भीतीमुळे आलेले नैराश्य
- अशा रुग्णांसाठी एक प्रश्नावली आणि त्याअंतर्गत १५० रुग्णांचा अभ्यास
- २० ते ३० टक्के रुग्णांवर कोरोनाआधी मानसिक उपचार
...