प्रभाग रचनेत कोणाचा पत्ता होणार कट?
ठाणे पालिकेत आज प्रभागांची माहिती मिळणार
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३१ ः ठाणे महापालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजण्यास सुरुवात झाली आहे. पाच वर्षे ज्या प्रभागासाठी काम केले, तो प्रभाग पुन्हा पदरात पडणार, की त्याची तोडफोड होऊन कोणत्या परिसराचा पत्ता कट होणार किंवा प्रभागात कोणता नवीन परिसर जोडला जाणार, ठाण्यात सध्या सर्व नगरसेवकांमध्ये या एकाच विषयाची चर्चा सुरू आहे. उद्या, १ फेब्रुवारीला प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा जाहीर होणार असल्याने ही धाकधूक वाढली आहे.
बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार ठाणे महापालिकेने यापूर्वीच प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे सादर केला आहे. त्यानुसार प्रभागांची संख्या, एकूण लोकसंख्या तसेच सदस्यसंख्यादेखील निश्चित करण्यात आली आहे. अशातच कच्च्या प्रारूप प्रभाग रचनेला अंतिम मान्यता देण्याची प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाने सुरू केली आहे. त्यातच राज्य निवडणूक आयोगाकडून मंगळवारी ही प्रभाग रचना जाहीर करण्यात येणार असून त्यावर नागरिकांच्या हरकती आणि सूचना मागविण्यात येणार आहेत.
ॉ ठाणे महापालिकेत सध्या चारसदस्यीय पॅनेल आहे; तर आगामी निवडणुकीत त्रिसदस्य पॅनेल राहणार आहे. त्यामुळे प्रभागाच्या सीमारेषा बदलून प्रत्येक प्रभागाचा आकार लहान होणार असून, प्रभागाची संख्या ३३ वरून ४७ वर पोहचणार आहे; तर दुसरीकडे १३१ ऐवजी १४२ नगरसेवक आगामी निवडणुकीनंतर निवडून येणार आहेत. पण या प्रभागरचना नक्की कशा असतील, याचे चित्र मंगळवारी स्पष्ट होणार आहे.
नवीन १४ प्रभागांवर नजर
१) आगामी निवडणुकीत प्रभागांची संख्या ३३ वरून ४७ होणार आहे. म्हणजे १४ नवीन प्रभागांची निर्मिती होणार आहे. या प्रभागांमधून अनेक इच्छुक उमेदवार संधी मिळेल, या आशेवर आहेत; तर त्याचा फायदा घेत वारसा हक्क पुढे चालविण्यासाठी अनेक विद्यमान नगरसेवकांनीही फिल्डिंग लावली आहे.
२) ठाणे महापालिकेत सद्यस्थितीत नगरसेवकांची संख्या १३१ इतकी आहे. २०११ च्या जनगणनेतील लोकसंख्येनुसार ही प्रभाग रचना तयार करण्यात आली होती. या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या १८ लाख ४१ हजार ४८८ हजार इतकी होती.
३) कोरोनामुळे २०२१ मध्ये जनगणना झाली नाही. त्यामुळे पालिकेची आगामी निवडणूक २०११ च्या जनगणनेनुसार होणार आहे. असे असले, तरी प्रभागांच्या संख्येत ११ ने वाढ करण्यात आली असून यामुळे नगरसेवक संख्या १४२ इतकी होणार आहे.