गिरीश महाजन यांना दिलेला
न्यायालयाचा दिलासा कायम
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेसंबंधित प्रकरणात धमकी दिल्याचा आरोप असलेले भाजपचे नेते गिरीश महाजन यांना दिलेला दिलासा मुंबई उच्च न्यायालयाने १५ फेब्रुवारीपर्यंत कायम ठेवला.
महाजन यांच्यावर १५ फेब्रुवारीपर्यंत कठोर कारवाई करू नये, असे निर्देश न्यायालयाने आज पुण्यातील कोथरूड पोलिस विभागाला दिले. महाजन यांच्यासह अन्य दोघांनी यासंबंधी दाखल झालेला गुन्हा रद्दबातल करण्यासाठी न्यायालयात याचिका केली आहे. सोमवारी न्या. प्रसन्ना वारळे आणि न्या. अनिल किल्लोर यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर सुनावणी झाली.
जळगावमधील निभोरा पोलिस ठाण्यात याबाबत प्रथम फिर्याद नोंदविण्यात आली होती. जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे विश्वस्त ॲड. विजय पाटील यांनी ही तक्रार दाखल केली आहे; परंतु घटना पुण्यात घडली असल्याने तक्रार पुण्यात नोंदविण्यात आली. जानेवारी २०१८ मध्ये घडलेल्या कथित घटनेवर डिसेंबरमध्ये २०२० मध्ये पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तीन वर्षांपूर्वी घडलेल्या कथित घटनेवर ही फिर्याद केली आहे, एवढ्या उशिरा तक्रार केल्याने ती रद्द करण्यासाठी हे पुरेसे कारण आहे, असा दावा महाजन यांच्यावतीने करण्यात आला आहे.
...