Wed, May 18, 2022

ठाणे जिल्हा परिषद घेतेय मातांची काळजी
ठाणे जिल्हा परिषद घेतेय मातांची काळजी
Published on : 31 January 2022, 2:14 am
बालमृत्यू, मातामृत्यू रोखण्याचे प्रयत्न
ठाणे जिल्ह्यात ४१ हजार महिलांना शासकीय योजनांचा लाभ
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३१ : ठाणे जिल्ह्यातील गर्भवती, स्तनदा मातांसाठी जिल्हा परिषदेने गेल्या काही काळापासून विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. ग्रामीण, आदिवासी, दुर्गम पाड्यात आजही घरात गर्भवतींची प्रसूती करण्यात येत असल्याने हे चित्र बदलण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सरकारी योजना महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची विशेष फळी उभारली गेली असून मागील दोन वर्षांत ४१ हजार ७४ महिलांनी विविध योजनांचा लाभ घेतल्याची माहिती आरोग्य विभागाकडून मिळाली आहे.
ग्रामीण भागातील गर्भवती, स्तनदा मातांचे आरोग्य उत्तम राहावे, तसेच मातामृत्यू आणि बालमृत्यू रोखण्यासाठी राज्य शासनामार्फत गर्भवती आणि स्तनदा मातांसाठी विविध योजना राबविण्यात येते. ही योजना ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात अधिक कार्यक्षमतेने जिल्हा परिषदेकडून राबविण्यात येत आहे. घरात बाळंतपण झाल्यास महिला, बाळाला धोका निर्माण होण्याची शक्यता असते. गरोदर महिलांची प्रसूती आरोग्य केंद्रात तज्ज्ञ डॉक्टरांच्या साह्याने व्हावी, यासाठी अनेक योजना राज्य सरकारकडून राबविण्यात येतात. मात्र तळागाळापर्यंत या योजनांची अंमलबजावणी जिल्हा परिषद स्तरावर करण्यात येते. ठाणे जिल्ह्यातील १९ हजार ५१६ महिलांनी पंतप्रधान मातृवंदना योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनांच्या माध्यमातून ठराविक रक्कम अनुदान स्वरूपात महिलांच्या बॅंक खात्यावर पाठविली जाते, अशी माहिती जिल्हा परिषदेमार्फत देण्यात आली.
घरोघरी जागृतीवर भर
या योजनांची माहिती ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत पोहोचावी, यासाठी गाव स्तरावर योजनांची माहिती देणारे पत्रक लावले जातात. आरोग्य सेविका आणि अंगणवाडी सेविका गरोदर महिला, तसेच स्तनदा मातांच्या घरोघरी जाऊन माहिती देत असतात.
गर्भवतींसाठी सोनोग्राफी योजना
ग्रामीण भागात सरकारी आरोग्य केंद्रात सोनोग्राफी सेंटर कमी आहेत. त्यामुळे अनेकदा या भागातील गर्भवती महिला सोनोग्राफी करण्याचे टाळतात. मात्र, या महिलांचीही सोनोग्राफी नियमित व्हावी, यासाठी जिल्हा परिषदेमार्फत महिलांना सोनोग्राफीचा आणि प्रवास खर्च असे एकूण एक हजार रुपयांचे अनुदान दिले जाते.
कोट
गर्भवती, तसेच स्तनदा मातांना या योजनांचा लाभ मिळावा, यासाठी सर्वप्रथम आरोग्य विभागाकडे महिलांची नोंदणी केली जाते. तसेच गावागावांत या योजनांची माहिती प्रसारित केली जाते. आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत नोंदणी झालेल्या महिलांच्या आरोग्याची वारंवार चौकशी करण्यात येत असते.
- डॉ. भाऊसाहेब दांगडे, मुख्य कार्यकारी अधिकारी.
चौकट
मागील दोन वर्षांत विविध योजनांचे लाभार्थी
योजना लाभार्थी संख्या योजनेचे कार्य
जननी सुरक्षा योजना ७,८८० गर्भवतींची रुग्णालयात प्रसुती
मानव विकास योजना ५,८७१ वैद्यकीय मदत, सकस आहार
पंतप्रधान मातृ वंदना योजना १९,५१६ पहिल्यांदा गर्भवतींसाठी मदत
नवसंजीवन योजना ७,८०७ महिला, बाळाची झीज भरणे
Web Title: Todays Latest Marathi News
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..