डबलडेकर बस खरेदीस मनसेचा विरोध
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : निविदा न काढता बेस्टने डबलडेकर बसगाड्यांची खरेदी केली आहे. शिवाय चुकीच्या पद्धतीने निविदा जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे याविरोधात मनसेच्या शिष्टमंडळाने बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्रा यांची भेट घेतली. निविदा रद्द न केल्यास लोकायुक्त आणि न्यायालयात दाद मागण्याचा इशारा या वेळी देण्यात आल्याचे शिष्टमंडळाने दिला.
पक्षाचे पदाधिकारी केतन नाईक यांनी चंद्रा यांची भेट घेतली. त्यावर चंद्रा यांनी अतिरिक्त बसगाड्या विनानिविदा पुरवठा करण्याची परवानगी बेस्ट समितीने दिल्याचे चंद्रा यांनी मान्य केल्याचे नाईक म्हणाले.
...
विरोध का?
प्रदूषण नियंत्रणासाठी बेस्टने डिसेंबरमध्ये २०० वातानुकूलित डबलडेकर इलेक्ट्रीक बसगाड्यांची सेवा पुरवठा करण्याचे निविदा जाहीर केल्या. निविदा अटीनुसार पुरवठा करण्यात येणाऱ्या बसगाड्यांची संख्या वाढविणे प्रतिबंधित आहे. तरीही कोणत्याही प्रकारची नवी निविदा प्रणाली न राबविता ‘मे कोसिस ई-मोबिलिटी प्रा. लि. आणि मे स्विच मोबिलिटी ऑटोमोटीव्ह लि. या दोन आस्थापनांना ४०० गाड्या पुरविण्याची मुभा दिली आहे. महाराष्ट्र शुद्ध हवा अभियानाअंतर्गत शहरासाठी १,२५० कोटींचा निधी मंजूर झाल्याचे समजते; परंतु कुठल्याही प्रकारची निविदा प्रक्रिया न राबविता बेस्ट समितीने फक्त पालिका निवडणुका समक्ष ठेवून घाईघाईने उपलब्ध निधीचा गैरवापर करून सदरचे कंत्राट देऊ केले आहे. याबाबत खुलासा करावा व चुकीच्या पद्धतीने लागू करण्यात आलेले कंत्राट रद्द करून नव्याने टेंडर प्रक्रिया राबवून स्पर्धात्मक दर पाहून ठेकेदारांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणीही मनसेने केली आहे.
...