दिल्ली-जेएनपीटी महामार्ग झाल्यास ठाण्याची वाहतूककोंडीतून सुटका
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ३१ : मालवाहतूक खर्च ही देशातील सर्वात मोठी समस्या आहे. हा खर्च कमी करण्यासाठी रस्ते, रेल्वे, हवाई आणि जल वाहतुकीत आमूलाग्र बदल होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने कामे सुरू असून दिल्ली-जेएनपीटी महामार्ग झाल्यास दिल्ली ते मुंबई हे अंतर अवघ्या १२ तासांत पार करता येणार आहे. शहराच्या अंतर्गत होणारी अवजड वाहनांची वाहतूक शहराच्या बाहेरून मार्गस्थ झाल्याने ठाणे, कल्याण डोंबिवलीकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होईल व ठाण्यातील प्रदूषण देखील कमी होईल, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
कल्याण सुभेदार वाडा कट्ट्याच्या वतीने प्रा. रामभाऊ कापसे स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प रस्ते, वाहतूक व महामार्ग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ऑनलाईन दृकश्राव्याच्या माध्यमातून गुंफले. यावेळी बदलापूरचे माजी नगराध्यक्ष रामभााऊ पातकर, आनंद कापसे, वरुण पाटील, पाठक यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री गडकरी यांनी श्रोत्यांशी संवाद साधताना सुखी, समृद्ध, शक्तीशाली संपन्न भारत असे स्वप्न साकारायचे असेल, तर शेती आणि उद्योग अधिक विकसित करण्याची गरज आहे. त्यासाठी पाणी, इंधन, वाहतुकीची साधणे आणि संवाद यात नवनवे प्रयोग साधावे लागतील. जलमार्ग हा सर्वात स्वस्त वाहतुकीचा मार्ग आहे. रस्त्यासाठी १० रुपये, रेल्वेसाठी ६ रुपये खर्च येत असेल तर जलवाहतुकीसाठी केवळ १ रुपया खर्च येतो. जलमार्ग सुधारले तर इंधनाची बचत होईल, वाहतूकही वाढेल. त्यामुळे १०२ जलमार्ग विकसित करण्याचे काम सध्या सुरू असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.
इलेक्ट्रिसिटीवर मोठ्या प्रमाणात काम होत आहे. इंधन बचत आणि प्रदूषण कमी करण्यासाठी ई-वाहनांचा वापर करण्यावर भर दिला जात आहे. ई हायवे आणि ग्रीन हायवे तयार केले जातील. देशात २२ ठिकाणी ग्रीन हायवे असतील. त्यामुळे प्रदूषण कमी होऊन वेळेची बचत होईल. तसेच लॉजिस्टीकवर होणाऱ्या खर्चाची बचत होण्यास मदत होईल. सीप्लेन, एअर स्ट्रिप, हॅलीपॅड यांचा विचार केला जात आहे. ठाणे, कल्याण या शहरांना खाडी किनारा लाभला आहे, तलाव या शहरांत आहेत, त्याचा वापर करता येईल का, याविषयी अभ्यास सुरू आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यावर भर दिला जात आहे. स्वदेशी व स्वावलंबन आधारे आपल्या देशातच इंधन, वाहने तयार करून अर्थव्यवस्था मजबुतीकरणावर भर दिला जात असल्याचे सांगत विविध योजना गडकरी यांनी जनतेसमोर मांडल्या.
चौकट
वाहतूक क्षमता दुप्पट झाली असती
नागपूरच्या धर्तीवर रोड, त्याच्यावर ब्रीज, त्यावर मेट्रो असे ठाणे येथे बांधता आले असते. त्यामुळे वेस्टर्न बायपास, इस्टर्न बायपासची कॅपॅसिटी डबल झाली असती असे तेव्हा मी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना म्हणालो होतो, त्यावर देवेंद्र म्हणाले की, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. पण ते राहून गेले ही बाब गडकरी यांनी यावेळी नमूद केली.
कल्पना प्रत्यक्षात आणणे आवश्यक
कृतिशील कल्पना केवळ मांडून चालत नाहीत, त्या प्रत्यक्षात आणल्या पाहिजेत. स्वप्न दाखवणारे नेते लोकांना आवडतात, पण ती स्वप्न पूर्ण केली नाही की लोकं नाकारतात देखील. जे दाखवलेली स्वप्न पूर्ण करतात त्यांना लोकं लक्षात ठेवतात. ही स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आमची आहे आणि ती आम्ही पार पाडू, असे ते म्हणाले.
प्रदूषण घटविण्यासाठी प्रयत्न
ग्रीन इंधन तयार करण्यावर भर दिला जात आहे. इथेनॉल हे डिझेलपेक्षा स्वस्त असून त्यामुळे दोन लाख कोटींची इकॉनॉमी वाढणार आहे. बायो एलएनजी व बायो सीएनजी ही गॅस इकॉनॉमी देशात विकसित करण्यात येत असून त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. सीएनजीवर चालणारी वाहने तयार करण्यासाठी आज विविध कंपन्या पुढे येत आहेत. त्याचबरोबर हवा, हायड्रो पॉवरला चालना दिली जात आहे. ग्रीन हायड्रोजन वापर करण्यासाठी कचऱ्यातून निर्माण होणाऱ्या मिथेन वायूपासून ग्रीन हायड्रोजनचा वापर करता येऊ शकतो, असे ते म्हणाले.