शहर स्वच्छतेसाठी ‘वॉर रूम’
मिरा-भाईंदर पालिका राबवणार ‘इंदूर मॉडेल’
भाईंदर, ता. १ (बातमीदार) : शहराची दैनंदिन स्वच्छता करण्यासाठी मिरा-भाईंदरमध्ये यापुढे इंदूर मॉडेल राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याअंतर्गत स्वच्छतेवर देखरेख ठेवण्यासाठी महापालिकेत स्वतंत्र वॉर रूम स्थापन करण्यात येणार आहे. या वॉररूममधून कचऱ्याची वाहतूक करणारी वाहने आणि सफाई कर्मचारी यांच्यावर लक्ष ठेवण्यात येणार आहे.
शहर स्वच्छतेच्या बाबतीत इंदूर शहराचा दरवर्षी पहिला क्रमांक येत असतो. स्वच्छतेची एक आदर्श पद्धत या शहराने विकसित केली आहे. हीच पद्धत स्वीकारण्याचा निर्णय आता मिरा-भाईंदर महानगरपालिकेने घेतला आहे. यासाठी आयसीटीचा म्हणजेच इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीचा वापर केला जाणार आहे.
स्वच्छतेवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिका लवकरच स्वतंत्र वॉर रूम स्थापन करणार आहे. या वॉर रूममध्ये आयसीटी यंत्रणेची अंमलबजावणी होणार आहे. आसीटी हे जीपीएस यंत्रणेवर आधारित सॉफ्टवेअर आहे. महापालिकेच्या कचरा वाहतूक करणाऱ्या बहुतांश वाहनांना जीपीएस यंत्रणा आहे; मात्र त्याचा आतापर्यंत योग्य वापर केला जात नव्हता. आयसीटी यंत्रणेद्वारे ही सर्व वाहने महापालिकेच्या वॉर रूमला जोडली जातील. ही वाहने कोणत्या भागात आहेत, कोणत्या ठिकाणी ती किती वेळ थांबली याची संपूर्ण नोंद वॉर रूममध्ये ठेवली जाणार आहे. एखादे वाहन एखाद्या भागात जास्त वेळ थांबलेले दिसले, तर वॉर रूममधील कर्मचारी त्याच्याशी तात्काळ संपर्क साधून विलंबाची विचारणा करणार आहेत.
सफाई कर्मचाऱ्यांवरही वॉर रूमद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे. या कर्मचाऱ्यांची दररोज सकाळी आणि दुपारी अशी दोन वेळा बायोमेट्रिक फेस रीडिंगद्वारे हजेरी घेतली जाणार आहे. त्याची नोंद वॉर रूममध्ये होणार आहे. सध्याच्या सफाई कर्मचाऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णयही महापालिकेने घेतला आहे. बाजार असलेल्या भागातील स्वच्छतेवर जास्त भर दिला जाणार आहे.
याव्यतिरिक्त शहरात रस्त्याच्या बाजूला पडणाऱ्या बांधकामाच्या डेब्रीजवर प्रक्रिया करणारा प्रकल्पही लवकरच कार्यान्वित होणार आहे. या प्रकल्पात वाळू, धातू, माती स्वतंत्र केली जाणार असून त्यापासून विटा, गटारांवरची झाकणे तयार केली जाणार आहेत. उत्तन येथील गेली अनेक वर्षे साठून असलेल्या कचऱ्यावर काही दिवसांपासून बंद असलेले दोन लाख मेट्रिक टन कचऱ्यावरील बायोमायनिंगचे काम पुन्हा सुरू करण्यात आले आहे.
स्वच्छ भारत अभियानातून महापालिकेला कचरा व्यवस्थापनासाठी ६७ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या निधीतून उत्तन येथील शिल्लक राहिलेल्या सुमारे नऊ लाख मेट्रिक कचऱ्यायावर बायोमायनिंग लवकरच सुरू होणार आहे. या सर्व उपाययोजनांद्वारे यंदा स्वच्छ भारत अभियानात चमकदार कामगिरी करण्याचे उद्दिष्ट महापालिकेने ठेवले आहे.
- रवी पवार, उपायुक्त, मिरा-भाईंदर पालिका