समीर वानखेडे यांच्या बारचा परवाना रद्द
ठाणे जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २ ः कॉर्डेलिया क्रूझवरील ड्रग्ज पार्टीनंतर चर्चेत आलेले एनसीबीचे मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे यांच्या नवी मुंबईतील बारचा परवाना रद्द करण्यात आला आहे. वानखेडे सज्ञान नसतानाही त्यांच्या नावावर बारचा परवाना असल्याचे सिद्ध झाल्यानंतर ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी तो रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. जाणीवपूर्वक चुकीची माहिती दिल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने वानखेडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती.
समीर वानखेडे यांना देण्यात आलेल्या बार परवान्याची चौकशी सुरु होती. यासंदर्भात सर्व साक्षी, जबाब व कागदपत्रांची तपासणी झाल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने आपले आरोपपत्र जिल्हाधिकारी ठाणे यांना २९ नोव्हेंबर २०२१ रोजी सादर केले होते. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी ठाणे यांनी अनुज्ञफ्ती धारकास १४ डिसेंबर २०२१ रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. सदर नोटीशीस अनुज्ञप्ती धारकाचे स्पष्टीकरण व त्यांनी २१ डिसेंबर, ३० डिसेंबर आणि ४ जानेवारी २०२२ रोजी झालेल्या सुनावणी वेळी आपले म्हणणे सादर केले. अखेर यासंदर्भात सादर केलेल्या कागदपत्रांच्या पडताळणीनंतर जिल्हाधिकारी ठाणे यांनी सदर परवाना कायमस्वरुपी रद्द करण्याचा निर्णय १ फेब्रुवारी २०२२ रोजी जाहीर केला.
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी नवी मुंबईत असलेला सदगुरू रेस्ट्रो बारचा परवाना समीर वानखेडे यांच्या नावावर असल्याचे सांगितले होते. परवाना घेतला त्या वेळी त्यांचे वय अवघे १७ वर्षे होते. मग त्यांना परवाना कसा मिळाला, असा सवालही त्यांनी केला होता. वानखडे यांना राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली होती. बारच्या परवान्यासाठी किमान २१ वर्षे वयाची अट आहे. मात्र, असे असतानाही वानखेडे यांना बारचा परवाना मिळाला. २७ ऑक्टोबर १९९७ रोजी समीर वानखेडेंच्या नावे बारचा परवाना काढण्यात आला होता. त्यांचे वडील त्या वेळी उत्पादन शुल्क विभागात कार्यरत होते. तुमच्या नावे असलेला बार परवाना रद्द का करू नये, अशी विचारणा नोटिशीत करण्यात आली आहे. अशातच राजेश नार्वेकर यांनी त्याबाबत सहा पानी आदेश दिला आहे. त्यात वानखेडेंनी १९९७ मध्ये बारचा परवाना घेताना खोटी कागदपत्रे सादर केल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्र प्रतिबंध कायद्याच्या कलम ५४ नुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
---
परवाना देण्यात आला त्या वेळी समीर वानखेडे सज्ञान नव्हते, ही बाब चौकशीत निदर्शनास आली. त्यानंतर त्यांच्या बारचा परवाना रद्द करण्याचे आदेश दिले.
- राजेश नार्वेकर, जिल्हाधिकरी, ठाणे.