सुनील पाटकर : सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्याच्या किनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात ऑलिव्ह रिडले प्रजातीची कासवे आढळतात. त्यांचे संवर्धन अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्याला आता आधुनिक तंत्रज्ञानाची मदत देण्यात येत असून रत्नागिरी जिल्ह्यातील वेळास सागरी किनाऱ्यावरील एका ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवाला उपग्रह टॅगिंग करण्याचा अभिनव प्रयोग नुकताच करण्यात आला. यामुळे कोकणातील समुद्रकिनाऱ्यांवर अंडी घालण्यासाठी येणाऱ्या या कासवांचा जीवनप्रवास उलगडणे शक्य होणार आहे. कासव संवर्धन चळवळीलाही यामधून अधिक बळदेखील मिळणार आहे.
मागील २० वर्षांपासून कोकणातील काही किनाऱ्यांवर चिपळूण येथील सह्याद्री निसर्ग संस्था वनविभाग आणि स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्यातून समुद्री कासवांच्या अंड्यांचे संवर्धन केले जात आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातील अनेक किनाऱ्यांवर ऑलिव्ह रिडले प्रजातीची कासव मादी अंडी घालण्यासाठी येत असतात. नोव्हेंबर ते मार्च हा त्यांचा विणीचा हंगाम असतो. अंडी घालणाऱ्या ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या अंड्यांचे सह्याद्री निसर्गसंवर्धन संस्थेच्या वतीने संवर्धन केले जाते. याबाबत संस्थेने स्थानिकांना विश्वासात घेऊन जनजागृती केली. पुढे वनविभागाचे कांदळवन कक्ष आणि स्थानिकांच्या मदतीने वेळास येथे कासव संवर्धन कार्यक्रम सुरू झाला. हळूहळू इथे निसर्ग पर्यटन सुरू झाले. दर वर्षी येथे कासव महोत्सवदेखील आयोजित करण्यात येतो.
मागील वर्षी तब्बल २४ हजार कासवांची पिल्ले संवर्धन करून कोकणातील समुद्रात रवाना करण्यात आली होती. समुद्राच्या किनाऱ्यांवर जाळ्या संरक्षित करून टोपलीखाली झाकून ठेवलेली इवलीशी कासवांची पिले समुद्रकिनाऱ्यावरून आपल्या पावलांचे ठसे उमटत जेव्हा समुद्रात प्रवेश करतात ते दृश्य खूपच सुंदर असते. हे पाहण्यासाठी हजारो पक्षी व प्राणीमित्र किनाऱ्यावर जमा होत असतात.
हे कासव नेमक्या कोणत्या भागातून ये-जा करतात, त्यांचा येथील प्रवास उलगडला जावा, यासाठी उपग्रहाच्या माध्यमातून त्यांना टॅग करायचे ठरले.
.....
पहिल्या कासवाला प्रथम नाव
रायगड जिल्ह्याच्या सीमेला लागून रत्नागिरी जिल्ह्यातील वेळास गाव आहे. कासव संवर्धनामुळे वेळासला आता देशभरात नव्हे, तर जगभरात एक नवी ओळख मिळाली आहे. वनविभागाच्या कांदळवन कक्ष आणि डेहराडूनच्या भारतीय वन्यजीव संस्थेच्या वतीने येथील एका ऑलिव्ह रिडले कासवाला पहिले उपग्रह टॅगिंग केले गेले. भारतीय वन्यजीव संस्थेच्या डॉ. आर. सुरेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम किनारपट्टीवरील हे पहिले उपग्रह टॅगिंग यशस्वीरीत्या पार पडले. या अभ्यासातून ऑलिव्ह रिडले कासवांच्या पश्चिम किनाऱ्याजवळ सागरातील प्रवासाबाबत माहिती मिळण्यास मदत होईल. ज्या कासवाला टॅग केले आहे, त्याला प्रथम असे नाव देण्यात आल्याचे कांदळवन कक्षाचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक वीरेंद्र तिवारी सांगितले.
.....
या ठिकाणी अधिवास
रायगड जिल्ह्यातील दिवेआगर, श्रीवर्धन, हरिहरेश्वर आणि मारळ किनारे हे कासवाच्या घरट्यांसाठी ओळखले जातात. रत्नागिरीतील वेळास, केळशी, आंजर्ले, कर्दे, मुरूड, दाभोळ, कोळथरे, लाडघर, वेळास, गुहागर, तवसाळ, गावखडी, माडबन किनारे संवर्धित करण्यात आले आहेत; तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शंभरहून अधिक किनाऱ्यांवर कासवांची घरटी आढळतात.