
पुष्पराज हॉटेलमार्ग एकेरी वाहतूक सुरुच राहणार
कल्याण, ता. १३ (बातमीदार) ः कल्याण स्टेशन परिसरात महात्मा फुले चौक ते वल्लीपिर रस्ता या परिसरात स्मार्ट सिटीअंतर्गत सॅटिसचे काम सुरू आहे. त्यामुळे येथे सकाळ-संध्याकाळ होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी कल्याण वाहतूक पोलिसांनी २० जानेवारीपासून महात्मा फुले चौक ते दीपक हॉटेल व्हाया पुष्पराज हॉटेल ते महात्मा फुले चौक अशी एकेरी वाहतूक प्रयोगिक तत्त्वावर सुरू केली होती. आता प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेला हा एकरी वाहतूक मार्ग यापुढे कायम राहणार असल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले.
कल्याण पश्चिमेला शिवाजी चौकामधून स्टेशनकडे जाताना पुष्पराज हॉटेलच्या उजव्या बाजूने जाण्यास बंदी असून त्या वाहनचालक महात्मा फुले चौकाकडे जाऊन उजव्या बाजूने जाऊ शकतात; तर कल्याण एसटी डेपोकडून आलेल्या वाहनचालकाला मुरबाड रस्त्याकडे जाताना दीपक हॉटेलच्या समोरून जाणाऱ्या रस्त्यावर जाण्यास बंदी असून त्याने वाहन दीपक हॉटेलकडे आल्यावर डाव्या बाजूने वळून पुष्पराज हॉटेल मार्गे महात्मा फुले चौकमार्गे पुढे जाऊ शकतात. उल्हासनगरमधून आणि मुरबाड रस्तामार्गे आलेल्या वाहनचालकांना महात्मा फुले चौक मार्गे शिवाजी चौकाकडे जाण्यास बंदी असून त्या वाहनचालकांनी महात्मा फुले चौकात आल्यावर उजव्या हाताने न जाता दीपक हॉटेलसमोर रस्त्यावर जाऊन उजव्या बाजूने वळून पुष्पराज हॉटेलमार्गे शिवाजी चौकाकडे जाऊ शकतात.
रिक्षाचालक, फेरीवाल्यांमुळे कोंडी
स्टेशन परिसरमधील स्मार्ट सिटी प्रकल्प काम सुरू झाल्याने वाहतूक कोंडी फोडण्यासाठी वाहतूक विभागाने एकेरी मार्ग जाहीर केला; मात्र दीपक हॉटेल आणि पुष्पराज हॉटेल परिसरात रस्त्यावर फेरीवाल्यांनी बस्तान मांडले आहे. शिवाय एकेरी मार्गावर बेकायद रिक्षाचालक उभे राहत असल्याने येथे कोंडी होत आहे.
एकदिशा मार्ग प्रायोगिक तत्त्वावर सुरू होता. त्याला ७० टक्के हून जास्त नागरिक आणि वाहनचालकांनी प्रतिसाद दिल्याने तो कायम मार्ग ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला वाहनचालक आणि नागरिकांनी सहकार्य करावे.
- महेश तरडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कल्याण वाहतूक विभाग
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..