
अनधिकृत आठवडी बाजाराकडे पालिकेची वक्रदृष्टी
पनवेल, ता. १५ (प्रतिनिधी) : पालिका हद्दीत अनधिकृतपणे भरवण्यात येत असलेल्या आठवडी बाजाराचे छायाचित्र काढण्यासाठी गेलेल्या ''सकाळ''च्या छायाचित्रकाराला करण्यात आलेल्या दमदाटी आणि धक्काबुक्कीची गंभीर दखल पालिका प्रशासनाने घेतली आहे. विनापरवानगी भरवण्यात येत असलेल्या या अनधिकृत बाजारावर कारवाई करण्याचे आणि हे बाजार भरवण्यावर बंदी आणणार असल्याची माहिती पालिका उपायुक्त कैलास गावडे यांनी दिली आहे.
नवीन पनवेल-सुकापूर मार्गावर पालिकेच्या मालकीच्या राजीव गांधी मैदानावर दर सोमवारी अनधिकृत आठवडी बाजार भरवण्यात येत असतो. या बाजाराची माहिती मिळताच दैनिक ''सकाळ''चे छायाचित्रकार अनिकेत गावडे सोमवारी सायंकाळी तिथे गेले होते. बाजाराचे चित्रीकरण करत असतानाच त्या ठिकाणी असलेल्या काही गावगुंडानी गावडे यांच्या हातातील मोबाईल हिसकावून घेत त्यांना जवळच असलेल्या भाजपचा फलक लावलेल्या कार्यालयात नेले. या ठिकाणी गावडे यांना धक्काबुक्की करत काढलेले छायाचित्र डिलीट करण्यासाठी धमकावण्यात आले. गावडे यांनी याबाबतची तक्रार पालिका अधिकाऱ्यांकडे केली असून, यापुढे अशा स्वरूपाचे विनापरवानगी भरवण्यात येणारे अनधिकृत आठवडी बाजार भरू देणार नसल्याचे आश्वासन उपायुक्त गावडे यांनी दिले आहे.
......
गावडे यांनी दिलेल्या तक्रारीची दखल घेण्यात आली असून, संबंधित प्रभाग अधिकाऱ्याला याबाबत माहिती देण्यात आली आहे. विनापरवानगी भरवण्यात येणाऱ्या अशा बाजारांवर कारवाई करण्याची सूचना दिली आहे.
- कैलास गावडे. उपयुक्त पालिका
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..