
तर एक दिवस सभागृहाचे अधिकार संपुष्टात येतील
डोंबिवली, ता. २० ः राजकारणात आरोप-प्रत्यारोप होत असताना भाषेचा स्तर खालावत चालला आहे. सार्वभौम सभागृहात देखील सदस्यांचे बोलणे, वागणे योग्य नसल्याने काहींवर निलंबनाची कारवाई केली गेली. सर्वोच्च न्यायालयाला यामध्ये पडावे लागले. हे योग्य नसून असेच सुरू राहिले तर सभागृहाचे सर्व अधिकार एक दिवस संपुष्टात येतील, अशी भीती विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी कल्याण येथे व्यक्त केली.
रविवारी (ता. २०) गोळवली येथे राष्ट्रवादीच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. वंडार पाटील, रमेश हनमंते, युवक कॉंग्रेस जिल्हा अध्यक्ष सुधीर पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना विधासभा उपाध्यक्ष झिरवळ यांनी वरील विधान केले. ते म्हणाले, यंदा सभागृहात केवळ सहा दिवस सेशन चालते. मात्र त्यातही एखादा विधायक प्रश्न उपस्थित झाला की मागचे काही तरी काढून सभागृहाचा वेळ वाया घालवण्यात येतो. यामध्ये प्रत्येक मिनिटाला जनतेचे पैसे खर्च होत असतात, याची खंत वाटते. याचा सर्वच पक्षांनी विचार केला पाहिजे, असे ते म्हणाले. सभागृहातील सदस्यांनी योग्य वर्तन ठेवावे. न्यायालयाचा, सभागृहाचा अवमान कोठेही होऊ नये यासाठी लवकरच सर्व पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावून संवैधानिक शब्दांचा वापर झाला पाहिजे याविषयी सूचना करणार असल्याचे झिरवळ यांनी सांगितले.
----------
कोट
ठाणे येथील कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न केलेल्या कामांचे श्रेय देखील काही लोक लाटतात, असे विधान केले होते. याविषयी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना विचारले असता ते म्हणाले, त्यांच्यासारख्या प्रगल्भ माणसाने असे काही तरी बोलावे हे अपेक्षित नाही. ठाण्यात श्रेयवादाची लढाई आहे, असे मला कधीही दिसले नाही.
- जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माण मंत्री.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..