
कर्नाळा बँकेच्या ठेवीदारांना केवायसीसाठी आवाहन
पनवेल, ता. २४ (बातमीदार) : गैरव्यवहारामुळे चर्चेत असलेल्या कर्नाळा नागरी सहकारी बँकेतील पाच लाखांपर्यंतची रक्कम संबंधित ठेवीदारांच्या विमा धोरणानुसार देण्यात येत आहे. त्यामुळे केवायसी आणि त्यांचे दुसऱ्या बँकेतील खाते क्रमांक देण्याचे आवाहन कर्नाळा बँक अवसायक ए. आर. हांडे यांनी केले आहे.
हांडे यांनी सांगितले की, वेगवेगळी पथके तयार केली आहेत. ठेवीदारांनी दिलेली केवायसी कागदपत्रे आणि दुसऱ्या बँकेचे खाते क्रमांक बरोबर आहेत की नाहीत, याची तपासणी करतो. प्रकरण मंजूर होऊन आले असले, तरी कोणाला कमी-जास्त रक्कम मिळू नये, यासाठी खबरदारी घेत आहोत. दररोज साधारण २५०-३०० ग्राहकांना बोलविण्यात येते. तपासणी करण्यासाठी १० काऊंटर आहेत.
केवायसी आणि दुसऱ्या बँकेचा खाते क्रमांक दिला नाही, त्यांच्यासाठी एक स्वतंत्र ‘केवायसी काउंटर’ आहे. तेथे बँकेच्या वेळात कागदपत्रे जमा करता येणार आहेत. हे काम चार महिने सुरू राहणार आहे, असे हांडे यांनी सांगितले.
.......
केवायसी कागदपत्रे सादर केली नाहीत, त्यांनी कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या कार्यालयात आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, छायाचित्र आणि ठेवीदारांच्या अन्य बँकेतील खात्याचा कॅन्सल चेक लवकर टपाल नाका येथील शाखेत जमा करावा. पहिल्या टप्प्यातील वाटप पूर्ण झाल्यावर आता कागदपत्रे देणाऱ्यांचा अर्ज मंजूर झाल्यानंतर यादीतील क्रमाने किमान आठ दिवस अगोदर कळविण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील कार्यवाही करून २-३ दिवसांत संबंधित बँकेस ठेवीदाराच्या खात्यात मंजूर रक्कम जमा करण्याची सूचना पाठवण्यात येईल, असे कर्नाळा बँक अवसायक ए. आर. हांडे यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..