वाडा तालुक्यातील १ कोटींची कामे पालघरला वर्ग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाडा तालुक्यातील १ कोटींची कामे पालघरला वर्ग
वाडा तालुक्यातील १ कोटींची कामे पालघरला वर्ग

वाडा तालुक्यातील १ कोटींची कामे पालघरला वर्ग

sakal_logo
By

वाडा, ता. २४ (बातमीदार) ः वाडा तालुक्यातील १ कोटी ३७ लाख रुपयांची विकासकामे ठेकेदारांनी मंत्रालयातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून पालघर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केली आणि त्या कामांची परस्पर बोगस बिले काढण्याचा प्रयत्न चालवला आहे, असा आरोप शिवक्रांती संघटनेचे अध्यक्ष शरद पाटील यांनी केला आहे. यासंबंधी त्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवले आहे. काही दिवसांपूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्या प्रकरणाची चौकशी शासनाच्या समितीमार्फत सुरू आहे.

पालघर जिल्ह्यासाठी ग्रामविकास मंत्रालयाने ३० मार्च २०२१ रोजी ६ कोटी ७ लाख रुपयांच्या विकासकामांना मंजुरी दिली होती. जि.प.च्या बांधकाम विभागाने या विकासकामांच्या कामाचे वाटप समितीच्या माध्यमातून करण्यासाठी कार्यवाही केली होती. मात्र, वाटपप्रक्रिया सुरू असतानाच आमदार दौलत दरोडा यांनी ३ जानेवारी २०२२ रोजी पालघरचे कार्यकारी अभियंता यांना पत्र देऊन वाडा तालुक्यातील कामे वाटपातून वगळावीत, असे सांगितले. त्यानंतर १० जानेवारी २०२२ रोजी तालुक्यातील १ कोटी ३७ लाखांच्या कामांसाठी ग्रामविकास मंत्रालयाने सुधारित आदेश काढला व ही कामे पालघर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केली. यासंबंधी शरद पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून तक्रार केली आहे. पालघर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे कामे वर्ग करणे नियमबाह्य आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
------------
चौकशीची मागणी
यातील काही कामे दुबार आहेत. अन्य यंत्रणांकडून आधीच झालेली आहेत. त्यामुळे फक्त बोगस बिले काढण्यासाठीच तालुका बदलला आहे. या प्रक्रियेची चौकशी करावी, म्हणजे सत्य बाहेर येईल, अशी तक्रार निवेदनात केली आहे. वाडा तालुक्यातील विकासकामे पालघर सा. बां. विभागाकडे वर्ग करण्यास स्थानिक नागरिकांनीही विरोध केला आहे.