
भावनांची घनिष्ठ सरमिसळ नको
मुंबई, ता. २६ : दिल, दोस्ती आणि दुनियादारी हा प्रत्येकाच्या आयुष्याच्या जवळचा विषय आहे. प्रत्येक कॉलेजमधल्या मुलांचे वेगवेगळे किस्से असतात. कॉलेजमध्ये आधी भेट होते. तिरप्या नजरेतून मुलगा आणि मुलगी एकमेकांना बघतात. त्यातून असे वाटते की प्रेम झालेय; पण मुलीच्या मनात तशी भावना नसेल तर त्या मुलाला त्याचे नैराश्य येते. मुलगी म्हणते, आपण मैत्री करू. त्यामुळे ही होणारी सरमिसळ आपल्याला सोडवायची आहे, अशा शब्दांत व्याख्याते डॉ. सागर पाठक यांनी तरुणांसमोर प्रेम आणि मैत्रीतील नाते उलगडून दाखवले. नाते आणि भावनांची सरमिसळ करू नका, असा सल्लाही त्यांनी दिला.
आपल्याला एका व्यक्तीबद्दल आकर्षण वाटते आहे, की प्रेम-मैत्री याचा गोंधळ या वयात वाढतो; पण या भावनांबद्दल नीट विचार केला पाहिजे. यातून आपले जीवन समृद्ध होते. तुम्हाला जे काही करायचे असेल त्यासाठी पाया भक्कम असायला हवा. तुमचे नातेसंबंध भक्कम लागतात. जर तुमचे वैयक्तिक आयुष्य चांगले असेल, तर तुम्ही कोणत्याही क्षेत्रात जाऊ शकतात. त्यातून समाज चांगला राहतो, असेही डॉ. पाठक म्हणाले. नाते आणि भावनांची सरमिसळ झाली की कोणी नैराश्यात जातो, कोणी वेडेवाकडे विचार करतो अथवा चुकीची पावले उचलतो. त्यामुळे भावना आणि त्या नात्याचा मला फायदा काय होणार, असा विचार कायम करत राहिले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात मित्र-मैत्रिणींची गरज आहे. त्यांच्यामुळे आपल्या जीवनाला अर्थ निर्माण होतो, पण मित्र किती व कसे असावेत हेही ठरवले पाहिजे. आयुष्यात एकच मित्र चांगला असावा. चुकांना समजून घेणारा, काळजी घेणारा असावा. दुसऱ्या बाजूने विचार केला तर आपल्याला प्रत्येक क्षेत्रातील अगणित मित्र असायला हवेत. त्यातून अगणित मते तयार होतात आणि मग त्याच्यातून मला फायदा काय, हा प्रश्न विचारायला हवा. भावनिक आणि वास्तववादी प्रेमातला फरक ओळखा. वेळेआधी शारीरिक सुख ओरबाडून घ्यायचा प्रयत्न करू नये, असा सल्लाही डॉ. पाठक यांनी तरुणांना दिला. मैत्री करताना कोणतीही अट नसावी. आपला गैरफायदा घेण्यासाठी मैत्री केली आहे का, हा विचार करा. म्हणजे जेव्हा नवीन मित्र-मैत्रीण करता तेव्हाच त्यांच्या हालचालींवर आणि प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवा असेही ते म्हणाले. लैंगिकता विषयावर जास्त चर्चा केली जात नाही. शिक्षणाच्या अभ्यासक्रमातही त्याचा समावेश झालेला नाही. आजही या विषयावर आपण बोलण्यास घाबरतो, लाजतो; पण आता या विषयावर बोलणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले.
आकर्षण म्हणजे नेमके काय?
एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी गेलो आणि तिथून तो सूर्य बघितला तर आपण पटकन म्हणतो, की प्रेमात पडलो; पण ते प्रेम नसते तर ते आकर्षण असते सौंदर्याचे. आकर्षण हे क्षणिक असते. खरे आकर्षण म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या गुणांकडे आकर्षित होणे. आपण एखाद्याकडे आकर्षित होतो; पण त्याचा आपल्याला फायदा काय, हा प्रश्न जेव्हा तुम्हाला पडेल तेव्हा आयुष्यात खरा बदल होईल, असे डॉ. पाठक यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..