
आदर्श उपविधीला मान्यता
पनवेल, ता. २६ (बातमीदार) : दिनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत ‘फेरीवाल्यांना सहाय्य’ यासाठी पनवेल महापालिकेने पुढाकार घेतला आहे. त्याच अनुषंगाने फेरीवाला धोरणांतर्गत आदर्श उपविधीला पनवेल महापालिकेच्या शहर फेरीवाला समितीच्या सभेत गुरुवारी (ता. २४) मान्यता देण्यात आली.
पनवेल महापालिकेची शहर फेरीवाला समितीची सभा गुरुवारी आयुक्त गणेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यालयात घेण्यात आली. या बैठकीला शहर फेरीवाला समितीचे सर्व सदस्य, उपायुक्त कैलास गावडे, दिनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाचे व्यवस्थापक विनया म्हात्रे, नवनाथ थोरात उपस्थित होते.
फेरीवाला सहाय्य अभियानांतर्गत शहरातील फेरीवाल्यांच्या विविध गरजा व समस्या सोडवण्यासाठी महापालिका पुढाकार घेत आहे. या अंतर्गत फेरीवाला समितीची स्थापना करण्यात आली आहे. आज फेरीवाला धोरणांतर्गत महापालिका हद्दीतील पथविक्रेत्यांचे सर्वेक्षण व नोंदणी करणे, विक्री प्रमाणपत्र व ओळखपत्र तयार करणे, विक्री शुल्क व आकारणी करणे, फेरीवाल्यांसाठी बाजारपेठांचा विकास करणे, स्थिर फेरीवाल्यांसाठी जागेची निश्चिती करणे त्याचप्रमाणे फिरते फेरीवाले झोन, नो फेरीवाले झोन निश्चिती करणे, या उपविधी विषयांचे प्रेझेंटेशन देण्यात आले. या आदर्श उपविधीस समितीने सर्वानुमते मान्यता दिली.
उद्दिष्ट्ये
फेरीवाल्यांना सहाय्य अभियानांतर्गत महापालिकेच्यावतीने फेरीवाल्यांचा बाजाराच्या गरजेच्या आधारावर कौशल्यांचा विकास करून त्यांच्या उपजीविकेचा दर्जा उंचावण्यावर भर देण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने शहरी फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करणे, त्यांना ओळखपत्र देणे, शहर फेरीवाला आराखडा विकसित करणे, फेरीवाला क्षेत्रासाठी आवश्यक पायाभूत सुविधांचा विकास करणे, त्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन त्यांचा आर्थिक विकास करणे ही उदिष्ट्ये ठेवण्यात आली आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..