
पर्यटकांना माथेरानच्या मिनी ट्रेनचे आकर्षण; मध्य रेल्वने जमवला दोन कोटींचा गल्ला
मुंबई : मुंबई महानगरातील पर्यटकांसाठी सर्वांत जवळचे आणि लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणून माथेरान (Matheran) ओळखले जाते. कोरोना काळानंतर अनलॉकच्या कालावधीत निसर्ग सौंदर्यांचा आस्वाद घेण्यासाठी अनेकांनी माथेरानला भेट दिली. पर्यटकांना (tourist visit to matheran) येथील मिनी ट्रेनचे (Mini Train) आकर्षण आहे. त्यामुळे मागील एका वर्षात मिनी ट्रेन चालवून दोन कोटींची कमाई मध्य रेल्वेने केली आहे. यामध्ये पार्सल आणि प्रवासी वाहतुकीतून रेल्वेच्या महसुलात (central railway) वाढ झाली आहे.
मध्य रेल्वेची नेरळ ते माथेरान अशी मिनी ट्रेनची सुविधा आहे. मात्र मागील दोन वर्षांपासून पावसामुळे येथील रेल्वे मार्गाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे नेरळ ते अमन लॉज दुरुस्तीचे काम सुरू आहे. माथेरान ते अमन लॉज शटल सेवा सुरू असून माथेरान पर्यटनाला चालना देत आहे. मध्य रेल्वेने अमन लॉज आणि माथेरान दरम्यान आठवड्याच्या दिवशी एकूण १६ सेवांसह आणि आठवड्याच्या शेवटी २० सेवा पुरवल्या आहेत. त्यामुळे जानेवारी २०२१ ते जानेवारी २०२२ या कालावधीत तीन लाख १३ हजार ६६४ प्रवाशांनी यातून प्रवास केला. ४४ हजार ७७९ पार्सल/ वस्तू पॅकेजेसची वाहतूक केली.
पर्यटकांना आरामदायी सेवा देण्यासोबत प्रवाशांच्या सामग्रीची स्वस्त आणि जलद वाहतूक करण्यासही ही सेवा मदत करत आहे. यामुळे जानेवारी २०२१ ते जानेवारी २०२२ या कालावधीत रेल्वेचे उत्पन्न १.९३ कोटी झाले आहे. यामध्ये प्रवासी उत्पन्न १.८९ कोटी रुपये आणि पार्सलमधून उत्पन्न ३.५९ लाख रुपये आहे.
नोव्हेंबर २०२१ या महिन्यात २७.८६ लाख प्रवासी आणि पार्सल उत्पन्नासह अव्वल स्थानावर आहे. डिसेंबर २०२१ मध्ये २७.३७ लाख एकूण प्रवासी आणि पार्सल उत्पन्न झाले आहे.
जानेवारी २०२२ मध्ये १९.२६ लाखांच्या उत्पन्न झाले. ३२ हजार १२८ प्रवाशांकडून १९.०३ लाखांचे उत्पन्न मिळाले. दोन हजार ८४३ पार्सलमधून २१ हजार ५८२ रुपये मिळाले.