
ठाण्यात महाशिवरात्रीचा उत्साहात
ठाणे, ता. १ (बातमीदार) : कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे मागील वर्षी महाशिवरात्रीनिमित्त ठाणे शहरातील सर्व मंदिरे बंद असल्यामुळे भाविकांना प्रत्यक्ष दर्शनापासून मुकावे लागले होते; मात्र यंदा कोरोना आटोक्यात येऊन भाविकांना प्रत्यक्ष दर्शनासाठी मंदिरे खुली करण्यात आल्यामुळे मंगळवारी दिवसभर ठाण्यातील सर्व शिवमंदिरांबाहेर भाविकांची उत्साहपूर्ण गर्दी पाहायला मिळाली.
मंगळवारी ठाण्यातील बाजारपेठ परिसरातील प्राचीन कोपिनेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त सुमारे एक लाख नागरिकांनी भेट दिली. पहाटेपासूनच ठाण्यासह मुंबई उपनगरातील भाविकांनी दर्शनासाठी कोपिनेश्वर मंदिराबाहेर भली मोठी रांग लावली होती. या वेळी मंदिर व्यवस्थापनाने कोरोना संबंधित सरकारी नियमांचे फलक मंदिर परिसरात लावून भाविकांना सोशल डिस्टन्सिंगसह मास्क लावण्याच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. तसेच नियमांचे काटेकोरपणे पालन होण्यासाठी मंदिरात पोलिस बंदोबस्तदेखील तैनात करण्यात आला होता.
शहरातील शिवाजी नगर, रतन बाई कंपाऊंडमधील नागरिकांनी महाशिवरात्रीनिमित्त बर्फाची पिंड उभारली होती. तसेच चंदनवाडी परिसरातील शिवमंदिरात भाविकांनी श्रद्धापूर्ण भावनेने शंकराच्या पिंडीची भली मोठी रांगोळी रेखाटली होती. मनौपाडा भागातील स्वामी समर्थ संस्कार साधना केंद्र आणि जय भोलेनाथ शंकर सेवाभावी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महाशिवरात्रीनिमित्त भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.