महिलांसमोर आरोग्य जपण्याचे आव्हान
ठाणे, ता. ७ (बातमीदार) : काळ बदलला तशी महिलांसमोरील आव्हानेही बदलत गेली आहेत. पुरुषप्रधान संस्कृती, बुरसटलेल्या चालीरिती यांची जोखड तोडून महिलांनी सर्वच क्षेत्रांमध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. पण घर, कुटुंब, करिअर आणि नोकरी अशी चौफेर तारेवरची कसरत करताना महिलांना अनेक आजारांनी जोखडायला सुरुवात केली आहे. विशेषतः बिघडलेल्या ऋतुचक्रामुळे त्यांना अनेक व्याधींना सामोरे जावे लागते. हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, दर पाच महिलांपैकी एक महिला पाळीच्या त्रासाने बेजार झाल्याचे समोर आले आहे.
पूर्वीच्या आणि आताच्या महिलांच्या जीवनपद्धतीत फरक पडला आहे. पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव पडल्याने जीवनशैली बदलली आहे. अनेक महिला, तरुणी ताणतणाव कमी करण्यासाठी किंवा कंपनी म्हणून, आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत धूम्रपान करताना दिसतात. मद्यसेवन करण्याचे त्यांच्यातील प्रमाण देखील वाढले आहे. या कारणांमुळेच महिलांमध्ये रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, थायरॉईडचे आजार, अनियमित मासिक पाळी, स्तनांसह गर्भाशयांच्या तोंडाचा कॅन्सर, हाडांचे आजार देखील वाढल्याची निरीक्षणे स्त्री-रोग तज्ज्ञ नोंदवित आहेत.
देशात दुसऱ्या क्रमांकावर असलेला स्तनांचा कॅन्सर आता पहिल्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर असलेल्या गर्भाशयाच्या तोंडाचा कॅन्सर दुसऱ्या क्रमांकावर आहे. देशात दरवर्षी कॅन्सरचे दीड लाखाहून अधिक रुग्ण नव्याने आढळून येतात. त्यातील ६० टक्के पेशंट बरे होत नाहीत, शेवटच्या टप्प्यात रोगाचे निदान होत असल्याने त्यांच्यावर उपचार करणे अशक्य होत असल्याचे मत स्त्री-रोग तज्ज्ञांनी नोंदवले. त्यामुळे आता महिलांनी घर, करिअर सांभाळताना स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचा सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे.
वध्यंत्वाच्या समस्यांमध्ये वाढ
बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक महिलांना मासिक पाळीच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. हे प्रमाण पाचपैकी एका महिलेला, त्यामुळे पिसीओडीचा आजार असल्याचे तपासणीत समोर आले आहे; तर ५० टक्के महिलांमध्ये सकस आहाराअभावी हिमोग्लोबिनची कमतरता दिसून आली आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार २२ ते २८ हे वय महिलेला आई होण्यासाठी योग्य आहे; मात्र सध्याच्या काळात करिअरकडे लक्ष देत असताना साधारपणे ३० ते ३२ वयापर्यंत मुली लग्नाचा विचार करतात आणि त्यानंतर मुलाला जन्म देईपर्यंत महिलेचे वय ३३ ते ३४ होऊन जाते. त्यामुळे योग्य वयात मूल न झाल्यामुळे महिलांमध्ये वध्यंत्व समस्यांमध्ये वाढ होत आहे. महिलांनी उशिरा मुलाचा विचार करताना स्त्री-रोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे मत डॉ. महेश बेडेकर (स्त्री-रोगतज्ज्ञ) यांनी सांगितले.
व्यायाम, चिंतन, निवांतपणा हरवला
केवळ शारीरिक व्याधीच नव्हे तर मानसिक आजारांनाही महिलांना सामोरे जावे लागते. कार्यालय, मुलांचे संगोपन अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडत मल्टिटास्किंग करणाऱ्या महिला अनेकदा स्वतःच्या मानसिक स्वास्थ्याकडे दुर्लक्ष करतात. विविध जबाबदाऱ्या पार पाडताना क्षमतेच्या बाहेर काम केल्यामुळे महिलांमध्ये तणाव तसेच चिडचिडेपणाची समस्या वाढत आहे. त्याचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष परिणाम शरीरावही पडत असतो. अनेक आजार हे मानसिकेतेशी जोडलेले असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. अशा परिस्थितीत महिलांनी तणावाबाबत आपल्या प्रियजनांशी संवाद साधायला हवा. मानसिक स्वास्थ्य उत्तम ठेवण्यासाठी स्वतःसाठी वेळ देत व्यायाम आणि चिंतन करायला हवे, असा सल्ला मानसोपचार तज्ज्ञ शैलेश उमाटे यांनी दिला आहे.
लठ्ठपणाची समस्या गंभीर
कोरोना साथीमुळे मागील दोन वर्ष वर्क फ्रॉम होम, वेळी अवेळी अन्नाचे सेवन, पौष्टिक अन्नाची कमतरता, व्यायामाचा अभाव, तसेच ताणतणाव आदींमुळे महिलांमध्ये लठ्ठपणाची समस्या वाढत आहे. लठ्ठपणा वाढल्यामुळे महिलांना नैराश्य, उच्च रक्तदाब, मधुमेह आदी आजार बळावून विविध समस्यांना सामोरे जावे लागते. तेव्हा महिलांनी बाहेरील अस्वास्थ्यकारक अन्न खाणे टाळून फळ तसेच पालेभाज्या, फळभाज्या आदी सकस अन्नाचे रोजच्या जेवणात सेवन करून व्यायामालाही महत्त्व द्यावे, असा सल्ला आहार तज्ज्ञ डॉ. शीतल म्हामुणकर यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.