
दिव्यात शिवसेनेला भाजपचा दणका
दिवा, ता. ८ (बातमीदार) : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमधून शिवसेनेत पक्षप्रवेश मोठ्या प्रमाणात होत होते. आता भाजपनेदेखील पलटवार केला असून महिलांच्या प्रश्नांवर दिव्यात काम करणाऱ्या व पाच वर्षांपासून शिवसेनेत कार्यरत असणाऱ्या तन्वी फाऊंडेशनच्या अध्यक्षा ज्योती राजकांत पाटील यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश झाला आहे. त्याचबरोबर शिवसेनेचे उपविभागप्रमुख राजकांत पाटील व शेकडो महिलांनीसुद्धा ज्योती पाटील यांच्यासह मंगळवारी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा हाती घेतला. या वेळी भाजपचे आमदार संजय केळकर, जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांच्यासह भाजपचे गटनेते मनोहर डुंबरे, नगरसेवक कृष्णा पाटील आदी उपस्थित होते.
या वेळी बोलताना केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील म्हणाले, की दिव्यात नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आता भाजपची ज्योत लागल्याशिवाय राहणार नाही. ज्योती पाटील यांच्यामुळे भारतीय जनता पक्षाची ताकद वाढेल, असेही कपिल पाटील म्हणाले. आमदार संजय केळकर म्हणाले, की दिव्यातील समस्यांवर आवाज उठवण्यासाठी कधीही हाक मारा, आम्ही त्या वेळी हजर असू. दिव्यातील सत्ताधाऱ्यांनी नागरिकांना सोयी-सुविधा न दिल्याने महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या समस्या सोडवण्यासाठी येणाऱ्या काळात दिव्यात परिवर्तन नक्की होणार, असा विश्वास भाजपचे ठाणे जिल्हा अध्यक्ष निरंजन डावखरे यांनी व्यक्त केला. दिव्यातील जनता नेहमीच्या समस्यांना कंटाळली असून या वेळी जनता शिवसेनेला जागा दाखवणार व भाजपचे नगरसेवक निवडून देणार, असे मत दिवा शहर मंडळ अध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी या वेळी व्यक्त केला.
ज्योती राजकांत पाटील यांच्यासोबत निशिगंधा तेली, सत्यवती राहटे, कमल असवले, सुचिता राबडे, अनिता सपकाळ, स्मिता मोहन निवाते, सारिका धनवडे, अश्विनी भुते, वैशाली चव्हाण, अनुष्का पाजवी, मंदा जाधव, श्रद्धा मोहिते, राणी विश्वकर्मा, अस्मिता गुप्ता, पूनम जाधव, मंगल पवार, अनुष्का मणियार, प्रज्ञा जगताप, तेजस्विनी मिस्त्री यांच्यासह सुमारे ३०० महिलांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..