डॉ. आंबेडकर स्मारकांच्या डोमचे काम अंतिम टप्प्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डॉ. आंबेडकर स्मारकांच्या डोमचे काम अंतिम टप्प्यात
डॉ. आंबेडकर स्मारकांच्या डोमचे काम अंतिम टप्प्यात

डॉ. आंबेडकर स्मारकांच्या डोमचे काम अंतिम टप्प्यात

sakal_logo
By

वाशी, ता. ३० (बातमीदार) ः नवी मुंबई महापालिकेच्या वतीने ऐरोली सेक्टर १५ येथे उभारलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक ५ डिसेंबर २०२१ रोजी अनुयांसाठी खुले करण्यात आले, मात्र स्मारकांच्या डोमला मार्बल लावण्याचे काम बाकी होते. हे काम अंतिम टप्प्यात असून आठवडाभरात पूर्ण होणार आहे. त्‍यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी स्मारकाला आणखी झळाळी येणार आहे.
दहा वर्षांपासून स्मारकांचे काम सुरू होते. अनेक अडथळ्यांमुळे ते रखडले होते. स्मारकातील लायब्ररी, हॉल, ग्रंथालय आदी सुविधा ६ डिसेंबर रोजी खुल्या करण्यात आल्या होत्या. मात्र डोमला मार्बल लावण्याचे काम सुरूच होते. ते आता अंतिम टप्प्यात आहे.
महापालिका आयुक्‍त अभिजित बांगर यांनी स्मारकाचे काम पूर्ण होण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले. सातत्‍याने बैठका घेत प्रत्यक्ष कामाची अनेक वेळा पाहणी केली. शहर अभियंता संजय देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता गिरीश गुमास्ते यांनी काम पूर्णत्वास नेले.
स्मारकांचे अंतर्गत काम पूर्ण झाल्‍याने ६ डिसेंबर २०२१ रोजी ते अनुयायांसाठी खुले करण्यात आले. यावेळी स्मारकांच्या अंतिम टप्प्यातील काम १४ एप्रिल २०२२ पर्यंत पूर्ण होणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले होते.
डोमला मार्बल लावण्याचे काम पूर्ण झाले आहे. स्मारकांच्या दर्शनी भागात नामफलकावरील अक्षरे मंद प्रकाशाने उजळणारी आहेत. त्याचप्रमाणे स्मारकातील ग्रंथालयात डॉ. आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेत लिहिलेली विविध ग्रंथसंपदा उपलब्‍ध आहे. याशिवाय ई-बुक व ऑडिओ बुक सुविधाही उपलब्ध आहे.

स्‍मारक उभारणीतील घडामोडी
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाला ६ एप्रिल २०११ मध्ये सुरुवात करण्यात आली. ५ एप्रिल २०१३ पर्यंत काम पूर्ण होणे अपेक्षित होते.
- महापालिकेकडून १२ कोटी ८४ लाख आणि आमदार निधीतून ३० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला. कामास उशीर झाल्याने खर्चात वाढ होत २५ कोटी ८२ लाखांपर्यंत गेला.
- पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण होईपर्यंत ऑक्टोबर २०१७ उजाडला. दोन वर्षांत स्मारकाचे काम पूर्ण होणे अपेक्षित असताना ऑक्टोबर २०१७ मध्ये पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले.
- स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामाला सुरुवात झाल्यानंतर डोमच्या इमारतीला मार्बलचे आच्छादान बसवण्याच्या कामासाठी १३ कोटी रुपये खर्च करून काम सुरू करण्यात आले.
- अंतर्गत सजावटीसाठी १२ कोटी खर्च करण्यात आले, हे काम ६ डिसेंबर २०२१ रोजी पूर्ण झाले. आता स्मारकाच्या डोमला मार्बलचे आच्छादन करण्याचे कामही पूर्ण झाले असून १४ एप्रिल रोजी संपूर्ण स्‍मारक अनुयायांसाठी खुले होईल.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक हा प्रत्येकासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा व अभिमानाचा विषय आहे. त्यादृष्टीने स्मारकामधील प्रत्येक काम गुणवत्ता राखूनच करण्यात आले आहे. स्‍मारकाचे अंतर्गत काम हे ५ डिसेंबर रोजी पूर्ण करण्यात आले आहे; तर डोमला मार्बल लावण्याचे काम आता पूर्ण झाले आहे.
- संजय देसाई , शहर अभियंता, नवी मुंबई महापालिका.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..