कोरोना बाधित विमानप्रवासी घटले
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ठिकठिकाणहून येणाऱ्या प्रवाशांचे कोरोना पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण घटले आहे. आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे कोविड पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण एक टक्क्याहून कमी झाले आहे. आकडेवारीवरून, कोविड पॉझिटिव्ह येणारे देशांतर्गत प्रवासीही गेल्या तीन महिन्यांत घटल्याचे समोर येत आहे. विमानतळावर जानेवारीत चाचणीदरम्यान सहा प्रवासी कोरोनाबाधित आढळले होते, त्यानंतर आता मार्चमध्ये ही संख्या शून्यावर आली आहे.
आकडेवारीनुसार, जानेवारीत ३९, ६०४ पैकी ९०९ आंतरराष्ट्रीय प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. याचा अर्थ सकारात्मकतेचा दर २.३० टक्के होता, जो फेब्रुवारीमध्ये घसरून ०.३० टक्क्यांवर आला. मार्चमध्ये हाच सकारात्मकता दर थोडा वाढून ०.४३ टक्क्यांवर पोहोचला, तरी चाचण्यांमधून केवळ एक टक्क्यांपेक्षा कमी बाधित आढळून येत आहेत. मात्र, तज्ज्ञांच्या मते, इतर देशांतील रुग्णांची वाढ लक्षात घेता सरकारने मुंबईला येणाऱ्या सर्व प्रवाशांचे आरटी-पीसीआर करणे अनिवार्य केले पाहिजे.
अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले की, मुंबईत येणाऱ्या प्रवाशांची संख्या दोन टक्क्यांपेक्षा जास्त नाही आणि ते प्रत्येक प्रवाशाची आरटी-पीसीआर करत आहेत; जर कोणी बाकी राहिले असेल तर संबंधित वॉर्डचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी त्यांच्या घरी भेट देतात आणि त्यांची चाचणी करतात.
आम्ही आंतरराष्ट्रीय प्रवाशांची विमानतळावर आरटी-पीसीआर करण्यास कोणतीही कसर सोडत नाही. शिवाय, आमच्याकडे २४ वॉर्ड वॉर रूम आहेत, जे सर्व प्रवाशांचा पाठपुरावा करतात आणि त्यांच्यापैकी कोणालाही लक्षणे दिसल्यास ते आरटी-पीसीआर घेत आहेत. त्यात कोणी पॉझिटिव्ह आढळल्यास आम्ही त्यांना जम्बो कोविड सेंटरमध्ये दाखल करतो, असेही काकाणी यांनी स्पष्ट केले.
प्रवाशांवर लक्ष देण्याची गरज
राज्य टास्क फोर्सचे सदस्य डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले की, गेल्या १५ दिवसांमध्ये ज्या देशांमध्ये कोरोना रुग्णांचा पुन्हा उद्रेक झाला आहे जसे की, साउथ कोरिया, फिलीपाईन्स, जर्मनी, हाँगकाँग, चीन येथून येणाऱ्या प्रवाशांवर विशेष लक्ष ठेवण्याची गरज आहे. कारण, तिथून ओमिक्रॉनचा उप प्रकार बीए-२ चे रुग्ण येत आहेत. त्यामुळे त्यांच्या चाचण्या नाही केल्या तरी स्क्रिनिंग करण्याची आवश्यकता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.