
पनवेल : विमा पॉलिसी काढण्याच्या बहाण्याने गंडा; टोळीविरोधात गुन्हा दाखल
पनवेल : विमा कंपनीचे (insurance company) कर्मचारी असल्याचे भासवून सायबर टोळीने (cyber crime) एका व्यावसायिकाला ऑनलाईन विमा (online insurance) काढण्यास प्रवृत्त केले आणि तब्बल २६ लाख ८० हजार रुपये उकळल्याचे उघडकीस आले आहे. पनवेल शहर पोलिसांनी (Panvel city police) या टोळीविरोधात फसवणुकीसह आयटी कायद्यानुसार (IT Act) गुन्हा दाखल केला आहे. व्यावसायिकाचे नाव सुरेश दवे (६७) असे असून ते पनवेलमधील लोखंडीपाडा येथे कुटुंबासह राहतात.
हेही वाचा: विद्यार्थ्यांना घेऊन शाळेची बस गायब, मुंबईतील धक्कादायक प्रकार
सप्टेंबर २०१९ मध्ये एचडीएफसी लाईफ इन्शुरन्सची कर्मचारी असल्याचे भासवून एका महिलेने त्यांना संपर्क केला. तिने संचालक कोट्यातून वन टाइम प्रीमियम भरून आरोग्य विम्याची ऑफर असल्याचे व त्यामध्ये घरातील सात जणांसाठी १२ लाखांचा १० वर्षांसाठी वैद्यकीय सेवा, इतर खर्च मिळणार असल्याचे सांगितले. दहा वर्षांनंतर वन टाइम प्रीमियमचे ९९ लाख ९९९ रुपये बोनससहित परत मिळतील, असे प्रलोभन दाखवले.
हेही वाचा: मोखाड्यात टंचाईग्रस्त 39 गाव पाड्यांना टॅंकरद्वारे पाणी पुरवठा
महिलेने दवे यांना वारंवार फोन करून पॉलिसी घेण्यास भाग पाडले. त्यानुसार दवे यांनी स्वत:चे व आपल्या दोन मुलांच्या नावाने जॉईंट पॉलिसी घेऊन ९९ हजार ९९९ रुपयांचे दोन चेक महिलेने पाठविलेल्या व्यक्तीकडे दिले. त्यानंतर दोन दिवसानंतर ए. पी. शुक्ला नावाच्या व्यक्तीने दवे यांना संपर्क साधून व्हेरिफिकेशनच्या बहाण्याने त्यांची सर्व माहिती घेतली. तसेच पॉलिसीच्या फाईलवर कंपनीने ७ लाख ८५ हजार रुपयांचा बोनस जमा केल्याचे सांगितले.
मात्र बोनसच्या रकमेच्या २५ टक्के रक्कम त्यांनी जमा केल्यानंतर ही रक्कम बँक खात्यात जमा करण्यात येईल, असे दवे यांना सांगितले. त्यामुळे दवे यांनी १ लाख ९६ हजार रुपयांची रक्कम शुल्काला पाठवली. त्यानंतर पॉलिसीच्या वेगवेगळ्या कारणासाठी वेगवेगळ्या खात्यांवर तब्बल २६ लाख ८० हजार रुपये पाठविण्यास भाग पाडले. मात्र त्यानंतरही दवे यांच्या खात्यात बोनस रक्कम जमा झाली नाही.
पनवेल शहर पोलिस ठाण्यात तक्रार
दवे यांनी संबंधित महिला तसेच शुल्काला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचे फोन बंद आले. त्यामुळे त्यांनी एचडीएफसी लाइफच्या कस्टमर केअरला संपर्क साधून माहिती घेतली असता, त्यांची कोणतीही पॉलिसी काढण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले. फसवणूक केल्याचे लक्षात येताच दवे यांनी पनवेल शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..