
शरद पवारांच्या घरावर हल्ला हा लोकशाहीचा खून
ठाणे, ता. ८ : मागील अनेक महिन्यांपासून विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. आता न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करीत एसटी कर्मचाऱ्यांनी गुरुवारी (ता. ७) पेढे वाटले. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या मुंबईतील व्यक्तिगत घरात अचानकपणे घुसत बाटल्या, चपला मारणे ही राज्याची संकृती नाही. हा प्रकार महाराष्ट्रातील लोकशाहीचा खून असल्याची टीका राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली. ठाण्यातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
घरावर हल्ले करून तुम्ही लोकांची मने जिंकू शकत नाही. त्याचा लोकांना किळस वाटायला लागला आहे. ८२ वर्षांचे पवार हे घरात असते, तर ते या आंदोलनकर्त्यांना सामोरे गेले असते. त्यांची मुलगी आंदोलनकर्त्यांना भेटायला गेली असता, त्यांनाही धक्काबुक्की करत हे चुकीचे असून याचा मी धिक्कार करतो. तुम्ही आमच्या नेत्याच्या घरापर्यंत जाणार असाल तर आम्ही त्याचा निषेध करतो. आम्ही शांततेचा मार्ग अवलंबणार असून लोकशाहीचा सन्मान करणारे असल्याने असे कृत्य कधीही स्वीकारणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
गेल्या पाच महिन्यांपासून संपकरी कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्रातील जनतेला वेठीस धरले आहे. न्यायालयात निकाल लागला, त्यावेळी निर्णयाचा जयजयकार केला, परंतु अचानक तुम्ही परत घरात घुसता, हे अयोग्य असल्याचेही त्यांनी सांगत ही घटना निंदनीय असल्याचे सांगितले. ज्या लोकांनी हे कृत्य केले, त्यांनी गेल्या पाच दशकांचा इतिहास तपासावा. राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या पाच-पाच संघटना होत्या. त्या संघटना पवार यांना माणणाऱ्या होत्या. याबाबत जुन्या एसटी कर्मचाऱ्यांना विचारून बघा, असा सल्लाही त्यांनी दिला.
महाराष्ट्राच्या इतिहासाला सोन्याची झालर
महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत आजपर्यंत असे कधीही घडलेले नाही. एकमेकांवर टीका करूनसुद्धा दुसऱ्याच्या व्यक्तिगत जीवनाचा सन्मान करायचा, हे महाराष्ट्राने कायम अनुभवले आहे. गोपीनाथ मुंडे यांनी १९९३ साली शरद पवार यांच्यावर शाब्दीक टीका केली होती. मात्र त्यावेळेस याचे पडसाद महाराष्ट्रात उमटतील, हा विचार मनात ठेवून पवार यांनी रात्री २ वाजता पोलिसांची बैठक घेऊन मुंडे यांची सुरक्षा दुप्पट केली होती. हा महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा स्पर्श असल्याचेही त्यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..