
सर्वसामान्यांसाठी सिडकोची घरे
वाशी, ता. ८ (बातमीदार) : सध्याच्या महागाई आणि मंदीच्या काळात सिडकोची परवडणाऱ्या दरातील घरे ही सर्वसामान्य नागरिकांसाठी फायदेशीर ठरणारी आहेत, असे उद्गार नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. सिडकोच्या जानेवारी २०२२ गृहनिर्माण योजनेच्या संगणकीय सोडतीचा प्रारंभ आज (ता. ८) एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आला. यावेळी त्यांनी दूरस्थ पद्धतीने आपला संदेश व्यक्त केला.
नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळासोबतच अन्य अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे शहरात घर लाभलेल्या अर्जदारांना घरांमध्ये केलेली गुंतवणूक ही भविष्यात फायदेशीर ठरणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. या प्रसंगी सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी, सहव्यवस्थापकीय संचालक अश्विन मुद्गल, सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. कैलास शिंदे, मुख्य दक्षता अधिकारी शशिकांत महावरकर, महाव्यवस्थापक (गृहनिर्माण) फैयाज खान आदी विभाग प्रमुख आणि अधिकारी दूरस्थ पद्धतीने उपस्थित होते. यावेळी डॉ. संजय मुखर्जी यांनी सिडको सर्वसामान्यांच्या घरांचे स्वप्न पूर्ण करण्यास कटिबद्ध असल्याचे सांगितले. सोडतीमध्ये घर लाभलेल्या अर्जदारांनी सिडकोमुळे नवी मुंबईसारख्या सोयी सुविधांनी परिपूर्ण शहरात आपल्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण झाल्याची भावना यावेळी बोलून दाखवली.
६,५०८ सदनिका उपलब्ध
सिडकोतर्फे २६ जानेवारी रोजी ५,७३० सदनिका तळोजा नोडमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. यानंतर द्रोणागिरी, घणसोली, कळंबोली, खारघर आणि तळोजा नोडमधील काही रिक्त सदनिकांची भर घालून एकूण ६,५०८ सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या. एकूण ६,५०८ घरांपैकी १,९०५ घरे ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाकरिता आणि ४,६०३ सदनिका ही सर्वसाधारण प्रवर्गाकरिता उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.
सिडकोच्या संकेतस्थळावर माहिती
जानेवारी-२०२२ गृहनिर्माण योजनेच्या सोडतीमध्ये यशस्वी ठरलेल्या अर्जदारांची यादी सिडकोच्या lottery.cidcoindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..