
अंबरनाथ स्थानकात प्रवाशांची गैरसोय
अंबरनाथ, ता. १२ (बातमीदार) ः अंबरनाथ रेल्वे स्थानकात बसवण्यात आलेला सरकता जिना गेल्या काही महिन्यांपासून बंद आहे. या सरकत्या जिन्याला जोडणारा पादचारी पूल धोकादायक झाल्याने तो पाडून टाकण्यात आला आहे. त्यामुळे रेल्वेतून उतरणाऱ्या प्रवाशांवर जिन्याच्या पायऱ्या चढून जाण्याची वेळ आली आहे.
अंबरनाथ रेल्वे स्थानकात एक ते तीन प्लॅटफॉर्म असून अलीकडेच नव्याने होम प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे. कर्जतच्या दिशेकडील रेल्वेच्या जुन्या पुलाला जोडणारा सरकता जिना रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी बांधण्यात आला होता; मात्र ज्या पुलाला सरकता जिना जोडण्यात आला होता. तो पूल जुना आणि जीर्ण अवस्थेत झाला होता. मध्य रेल्वेच्या मार्गावरील जुने पूल पाडून टाकण्याचे काम रेल्वेने हाती घेतले होते. त्याच वेळी अंबरनाथ येथील जुन्या पुलाबाबत रेल्वे प्रशासनाकडे विचारणा करण्यात आली होती. नंतर पूल तोडून टाकण्यात आल्याने त्या ठिकाणी बसवण्यात आलेला सरकता जिना सध्या वापराविना पडून आहे. सरकता जिना बंद असल्याने प्रवाशांना एका फलाटावरून दुसऱ्या फलाटावर जाण्यासाठी जिने चढूनच जाण्याची वेळ आली आहे.
अंबरनाथ रेल्वे स्थानकामध्ये मागील वर्षी होम प्लॅटफॉर्म बांधून प्रवाशांसाठी तो खुला करून देण्यात आला. त्याच वेळी मध्यभागी एक पादचारी पूल नव्याने बांधण्यात आला; मात्र सरकत्या जिन्याला जोडणाऱ्या पुलाची निर्मिती न केल्याने वयोवृद्ध प्रवाशांना सध्या पुलाच्या पाऱ्या चढून जावे लागत आहे.
अंबरनाथ रेल्वे स्थानकातसुद्धा सरकता जिना बसवल्याने प्रवाशांना चांगली सोय उपलब्ध झाली होती; मात्र सरकता जिना बंद असल्याने एका फलाटावर जाण्यासाठी अस्तित्वात असलेल्या पुलाच्या पायऱ्यांवरून चालत जावे लागते. त्याचा महिला, वृद्ध प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. रेल्वेने पुलाचे बांधकाम करून सरकता जिना पुन्हा लवकर सुरू करून प्रवाशांना दिलासा द्यावा.
- दीक्षा मोरे, अंबरनाथ.
सरकत्या जिन्याला जोडणारा पूल जुना झाल्याने तो पाडून टाकण्यात आला. नवीन पुलाच्या बांधकामाबाबत रेल्वे प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. निविदा प्रक्रिया सुरू आहे. लवकरच पुलाच्या कामाला सुरुवात होईल.
- जॉय अब्राहम, स्थानक प्रमुख, अंबरनाथ
रेल्वे स्थानकातील बंद असलेला सरकता जिना पादचारी पुलाला त्वरित जोडणारा पूल बांधावा यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि मध्य रेल्वेचे डीसीएम धीरेंद्र सिंग यांच्या निदर्शनाला आणून देण्यात आले आहे. प्रवाशांना होणारा त्रास दूर करण्याची मागणी करण्यात आली आहे.
- सुभाष साळुंके, डीयूआरसीसी, सदस्य, मध्य रेल्वे, अंबरनाथ
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..