रशिया-भारत मैत्रीचे ॠणानुबंध

रशिया-भारत मैत्रीचे ॠणानुबंध

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १६ : अफानासी निकीतीन भारताला भेट देणारा पहिला रशियन प्रवासी. व्यापारानिमित्त १५ व्या शतकात तो भारतात आला. त्याने आताच्या रायगड जिल्ह्यातील चौल बंदरातून भारतातील प्रवास सुरू केला. या ठिकाणी त्याचे स्मारक असून भारत आणि रशिया दरम्यानच्या मित्रत्वाचे प्रतीक मानले जाते. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून या दोन देशांनी मित्रत्वाचे नाते जपले. मागील दोन वर्ष कोरोना आणि आताच्या रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवरही ही मैत्री कायम आहे. अवघ्‍या काही दिवसांपूर्वी रशियाच्या शिष्टमंडळाने स्मारकाला भेट दिली.

रेवदंडा येथील कोकण एज्युकेशन सोसायटीच्या सरदार रावबहादूर तेंडुलकर विद्यालयात अफानासी निकीतीनचे अॅड. दत्ता पाटील यांच्या पुढाकाराने २००२ मध्ये बांधलेले सुंदर स्मारक आहे. दरवर्षी रशिया येथून येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करण्याची जबाबदारी कोकण एज्युकेशन सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांची असते. यात संस्थेनेही आपले ऋणानुबंध जपले आहे. मुंबईतील कौन्सिल जनरल ऑफ रशिया फेडरेशनचे अलेक्सी सुरोव्ट्सेव यांच्यासह नुकत्याच आलेल्या शिष्टमंडळाने नोंदवहीत भारत-रशिया मित्रत्वाचे नाते अधिक घट्ट होईल, अशी नोंद केली आहे. अफानासी निकीतीन याने तीन समुद्रांचा प्रवास करताना अनेक देश पादाक्रांत केले. त्यामुळे त्याचे स्‍मारक अनेक ठिकाणी आहेत. यातील भारतामधील हे एकमेव स्मारक. कोकण एज्युकेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक खोपकर सांगतात, १७ जानेवारी २००२ रोजी हे स्मारक उभारल्यानंतर रशियन दूतावास आणि रशियन नागरिक येथे सातत्याने येत. त्यांना येथे आल्यावर विशेष आनंद वाटतो, हा वसा जपण्याचा प्रयत्न नेहमीच करतो.
रशियातील त्वेर येथे अफानासी यांचा जन्म झाला. पंधराव्या शतकात मॉस्कोच्या वायव्येस सु. १६० किमीवरील कालिनीन शहरात ते व्यापार करीत. वास्को-द- गामा या पोर्तुगीज खलाशाआधी पंचवीस वर्षे आलेला पहिला युरोपियन प्रवासी म्हणून निकीतीन ओळखला जातो. १४६६ ते १४७२ या त्याच्या प्रवासातील काळात एकूण तीन वर्षे तो भारतात राहिला. त्‍याने लिहिलेले ‘व्हॉयेज बियोन्ड थ्री सीज’ हे प्रवासवृत्त उल्लेखनीय आहे. रशिया ते तीन समुद्र पार करून पुन्हा रशियाला पोचण्याच्या आपल्या सहा वर्षांच्या प्रवासकाळातील अनुभव, लोकांचे वर्णन, त्यांनी प्रवास केलेल्या शहरातील अंरे, त्याला लागलेला वेळ यांचे वर्णन त्याने प्रवासवृत्तात केले आहे. तसेच प्रवासात आलेली नैसर्गिक विघ्ने, त्याची झालेली लूट, झालेल्या लढाया यांबद्दलही विस्तृत लेखन केले आहे. भारतातील तत्कालीन समाज, त्यांच्या चालीरीती, त्यांचे धार्मिक विधी, तत्कालीन राजे व सरदारांची जीवनशैली यांचा सविस्तर उल्लेख आपल्या प्रवास वर्णनात केला आहे.

निकीतीनचे भारतातील वास्तव्य
भारतात तो दिव बंदरात उतरून खंबायतमार्गे चौल येथे पोहोचला. आपल्या प्रवास वर्णनात तो चौलचा उल्लेख ‘चीवील’ असे करतो. येथील माणसे खूप कमी कपडे घालतात. श्रीमंत व्यक्ती डोक्याला कापड बांधतात, खांद्यावरून कापड घेतात आणि दुसरे एक कापड कमरेभोवती गुंडाळतात; येथील स्‍त्रिया फक्त कमरेला कापड गुंडाळतात. चौलहून आठ दिवसांचा जमिनीवरील प्रवास करून निकितीन पाली येथे पोहोचला. पाली ते जुन्नर या प्रवासाला त्याला सोळा दिवस लागले व चौल ते जुन्नर हे अंतर १३० मैल असल्याचे त्याने लिहून ठेवले आहे.

निकीतीनचा खडतर प्रवास
निकीतीन रशियातील व्होल्गा नदीतून प्रवास करत बुझान येथे पोहोचला. तेथून निघून तो अस्‍त्रखान येथे पोहोचला. तेथे त्याला लुटण्यात आले. तेथून तो एका जहाजातून व्होल्गा नदीच्या मुखापाशी पोहोचला. तेथेही परत त्याचे जहाज लुटले गेले. पुढे कॅस्पियन समुद्रातून प्रवास करत तो डर्बेंट येथे पोहोचला. वाटेत त्याचे छोटे जहाज वादळात सापडून फुटले. पुढे जॉर्जिया, आर्मेनिया, इराण, मस्कत मार्गे प्रवास करत भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील दिव बंदरातून चौल येथे आला. भारतातून परतीचा प्रवास दाभोळ बंदरातून केला. येथून त्याने बोटीने परतीचा प्रवास सुरू केला. पुढे दोन महिन्यांचा प्रवास करून तो इथिओपियात पोहोचला. तेथून निघाल्यावर तो मस्कतमार्गे इराणच्या किनाऱ्यावरील ऑरमुझ येथे
उतरला. तेथून जमिनीवरून प्रवास करत लारमार्गे शीराझ येथे पोहोचला. तेथून पुढे तो याझ्ड, ताब्रीझ, तुर्कस्तानमधील सिवास मार्गे काळ्या समुद्राच्या किनाऱ्यावरील ट्रेबझोन या शहरात पोहोचला. १४७२ मध्ये आताच्या युक्रेनमधील कीवमार्गे आपल्या गावी म्हणजेच त्वेर येथे परतत असताना त्याचा मृत्यू झाला.

भारताबद्दल वाढली होती उत्सुकता
निकीतीनच्या लेखनात भारतातील विविध शहरे, धार्मिक पद्धती, देवदेवता, समाज, राजवैभव, त्यांचे पराक्रम, त्यांचे शौक यांबद्दल खूप माहिती मिळते. साडेपाचशे वर्षांपूर्वी लिहिलेल्‍या या प्रवासवृत्तामुळे भारताबद्दल परदेशी लोकांमध्ये खूप उत्सुकता निर्माण झाली. यामुळे पुढील काही वर्षांतच अनेक परदेशी दर्यावर्तींनी सागरी मार्गाने भारतात येण्याचा प्रयत्न केला आणि त्यात ते यशस्वीही झाले. त्याचबरोबर कोकण किनारपट्टीतील साडेपाचशे वर्षांपूर्वीचे लोकजीवन कसे होते, याचेही पुरावे त्याच्या प्रवास वर्णनात सापडतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com