
आग फक्त दुसऱ्यांकडेच लागेल असे नाही!
मुंबई, ता. १९ ः आगीशी खेळ हा अत्यंत घातक असतो, आग आपल्या इमारतीत लागणारच नाही, फक्त दुसऱ्याच इमारतीत लागेल, अशी विचारसरणीही घातक आहे. त्यामुळे आपल्या इमारतीचे फायर सेफ्टी ऑडिट करणे हिताचे आहे, असा सल्ला आज एका परिसंवादात तज्ज्ञांनी दिला.
अग्निसुरक्षा सप्ताहानिमित्त गोदरेज सिक्युरिटी सोल्युशन्सतर्फे आयोजित परिसंवादात एमआयडीसीचे मुख्य अग्निशमन अधिकारी संतोष वरिक, फायर सेफ्टी स्टँडर्ड अॅथॉरिटी ऑफ इंडियाचे अजित राघवन, सुरेश मेनन, फायर अँड सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडियाचे अशोक मेनन व मुंबई अग्निशमन दलाचे दीपक घोष आदींनी महत्त्वाच्या टिप्स दिल्या.
आज देशभरात आगीच्या लाखो घटना होतात व त्यात मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी होते. त्यामुळे सारा देशच अग्निप्रतिबंधक करण्यासाठी तशी यंत्रणा-पद्धती बनवून त्यात सरकार व समाज यांचाही सहभाग हवा. मुळात आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी चांगली अग्निविरोधी उपकरणे गरजेची आहेत. त्यांची सुयोग्य देखभालही गरजेची आहे. अनेकदा इमारतींमधील अशी उपकरणे सुरूच नसल्याचे आढळून येते, असेही सांगण्यात आले.
पालिका, अग्निशमन प्रशासनाने या साऱ्या गोष्टी तपासून इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र एकदा दिले की नंतर आगप्रतिबंधक उपकरणांच्या देखभालीकडे कोणीही लक्ष देत नाही. आग रोज लागत नाही, मात्र जर चुकूनमाकून लागली तर आगप्रतिबंधक उपकरणेच चालत नसतील किंवा ती उपकरणे रहिवाशांना वापरता येत नसतील, तरी काहीही फायदा नाही.
...
...आगीचा धोका वाढतो!
रहिवासी राहायला आल्यावर अनेक विजेची उपकरणे घरात येतात. त्यामुळे सुरुवातीपेक्षा एक दोन वर्षांनी इमारतीवरील आगीचा धोका वाढतो. अनेक रहिवासी इमारतींमध्ये नंतर रुग्णालये, कार्यालये उघडली जातात. त्यामुळे विजेचा वापर वाढतो. त्यामुळे अशा वेळी पुन्हा अग्निशमन दलाची परवानगी घेतली पाहिजे. गेली दोन वर्षे कोरोनामुळे कार्यालये बंद असल्याने आगप्रतिबंधक उपकरणांकडे मोठेच दुर्लक्ष झाले आहे, असेही या वेळी दाखवून देण्यात आले.
...
निम्म्या इमारतींकडून पालन
मुंबईत सुमारे दहा हजार गगनचुंबी इमारती आहेत. अग्निप्रतिबंधक नियमांचे पालन केल्याचा फॉर्म बी त्यापैकी निम्म्या इमारतींनीच भरून दिला आहे, अशी माहितीही या वेळी देण्यात आली.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..