
मोठ्या नाल्यांची सफाई कधी होणार?
धारावी, ता. २१ (बातमीदार) : पावसाळा तोंडावर आला तरीही पालिकेकडून मोठ्या नाल्यांच्या सफाईला धारावीत सुरुवात झालेली नाही. काही विभागात अंतर्गत छोट्या नाल्यांच्या सफाईचे काम धीम्या गतीने होत आहे. पश्चिम रेल्वेच्या माहीम स्थानकातून हार्बर मार्गावरील माहीम व किंग्ज सर्कल स्थानकादरम्यान आझाद नगर ‘डी’मधील दादर-माटुंगा नाला गाळाने व कचऱ्याने गच्च भरला आहे. त्यामुळे रहिवाशांना चिंता लागून राहिली आहे.
येथील रहिवासी भरलेल्या नाल्यामुळे धास्तावले आहेत. रेल्वेलगतच्या नाल्याची सफाई सुरू करण्याची मागणी होत आहे. नाल्यातील खोलवर रुतलेला गाळ काढला तरच त्याचा फायदा होईल, अन्यथा विभागात पाणी तुंबण्याची भीती व्यक्त होत आहे. रेल्वे रुळांखालून हा नाला धारावीतून वाहतो. नाल्यात शाहू गर, गीतांजलीनगर, आझादनगर आदी विभागातील सांडपाणी जात असते. सफाई वेळेवर झाली नाही तर याचा फटका रेल्वे वाहतुकीला बसण्याची दाट शक्यता आहे. पावसाळ्यात रेल्वेच्या रुळांवर पाणी आल्यावर लोकल गाड्यांची वाहतूक बंद पडल्याचा अनुभव प्रवासी गेल्या अनेक वर्षांपासून घेत आहेत. नाल्याच्या आसपास असलेल्या वस्त्यांमधून वाहणारे छोटे अंतर्गत नालेसुद्धा गाळ व कचऱ्याने तुंबले आहेत. हे नाले मुख्य नाल्याला जाऊन मिळतात. मुख्य नालाच साफ झाला नसल्याने या छोट्या नाल्यातून गाळ व कचरा तुंबून राहिला आहे. नालेसफाईस कधी सुरुवात होणार, याची चिंता स्थानिकांना लागून राहिली आहे. जर वेळेत सफाई झाली नाही तर पावसाळ्यात वस्तीत पाणी शिरण्याची भीती रहिवासी व्यक्त करत आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..