
ध्वनिनियंत्रण ठेवणारी आदर्शवत ‘अल शम्स’ मशिद
प्रकाश लिमये, भाईंदर
मशिदीवरील भोंग्याच्या आवाजावरून सध्या वातावरण ढवळून निघाले आहे. असे असले तरी मिरा रोडच्या ‘अल शम्स’ या मशिदीने मात्र हा गदारोळ सुरू व्हायच्या आधीपासूनच भोंग्यांच्या आवाजाच्या पातळीवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मात केली आहे. आवाजाच्या पातळीसंदर्भात न्यायालयाच्या आदेशांचे पालन करणारी भारतातील ही पहिलीच मशीद आहे, असे म्हटले तरी वावगे ठरू नये.
---------
मशिदीवरील भोंगे आणि त्यातील आवाजाच्या पातळीवरून सध्या वातावरण चांगलेच तापले आहे. या मुद्द्यावर गदारोळ सुरू झाल्यानंतर सरकार पातळीवरही त्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्या; मात्र मिरा रोडच्या नयानगर भागात असलेली ‘अल शम्स’ ही मशीद याला अपवाद ठरली आहे. भोंग्याचा मुद्दा उपस्थित होण्याच्या आधीच तसेच पवित्र रमझानचा महिना सुरू होण्याच्या सुमारे २० दिवस आधीच या मशीदीवरील भोंगे काढून टाकण्यात आले; तर मशिदीच्या आतील भागातील आवाजाच्या पातळीवरही न्यायालयाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे नियंत्रण ठेवण्यात आले आहे. यासाठी खास सॉफ्टवेअरवर आधारित जर्मन तंत्रज्ञान असलेली ध्वनियंत्रणा मशिदीत बसविण्यात आली आहे. मशिदीच्या ट्रस्टमार्फत नियुक्त केलेले अभियंता आणि माहिती तंत्रज्ञ यांनी मशिदीच्या आतील भागातील आवाजाची पातळी न्यायालयाच्या निकषानुसार निश्चित करून दिली आहे. त्यात कोणालाही बदल करता येत नाही आणि दररोज नमाजाच्या वेळी ध्वनिपातळी मर्यादेत राहील, यावर त्यांचे लक्ष असते.
कोविड काळात मशीद नमाजासाठी बंद होती. कोरोना सुरू झाल्यानंतर २० मार्चपासून मशिदीत नमाज पठण करण्यास बंदी घालणारी ‘अल शम्स’ ही पहिली मशीद होती. या काळात मशिदीच्या अंतर्भागाचे नूतनीकरण करण्याचा निर्णय ट्रस्टने घेतला होता. नूतनीकरणात अंतर्भाग अत्यंत आकर्षक पद्धतीने सजवण्यात आला आहे. आतील भिंतींवर अल्लाची ९९ नावे सुवर्णाक्षरात लिहिण्यात आली असून, त्या प्रत्येक नावाचा अर्थही सांगण्यात आला आहे. या सर्व भिंतींवर दिव्यांची ९०० प्रकारची रोषणाई केली आहे आणि ती वर्षभर सुरू राहणार आहे. मशिदीचे मुख्य द्वारही सुवर्णलेपित करण्यात आले आहे. मशिदीत ध्वनियंत्रणा बसविण्याच्या वेळी न्यायालयाने ध्वनिप्रदूषणाबाबत निश्चित केलेल्या निकषांचे तंतोतंत पालन करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी खास अमेरिकेतून ध्वनियंत्रणा मागविण्यात आली. ही यंत्रणा जर्मन तंत्रज्ञानावर आधारित असून त्याचे सॉफ्टवेअर विशिष्ट पद्धतीने विकसित करण्यात आले आहे. त्यामुळे मशिदीच्या आतील आणि बाहेरील आवाज मिळून ध्वनिपातळी न्यायालयीन आदेशांच्या मर्यादेत आपोआपच राखली जाते, अशी माहिती जामे मस्जिद अल शम्स ट्रस्टचे विश्वस्त मुझफ्फर हुसेन यांनी दिली.
कुराणातील श्लोकांचे उर्दूत भाषांतर
मशिदीत नमाजाच्या वेळी अरबी भाषेत कुराणाचे श्लोक वाचले जातात. मात्र अरबी भाषा फारशी कोणाला अवगत नसल्याने कुराणातील श्लोकांचा अर्थ नमाज पठणासाठी आलेल्यांना समजत नाही. यासाठी मशिदीतील अद्ययावत ध्वनियंत्रणेच्या सॉफ्टवेअरचा वापर कुराणातील अरबी श्लोकांचे उर्दू भाषेत रूपांतर करण्यासाठीही वापरण्यात आले आहे. हे भाषांतर मशिदीत येणाऱ्यांना ऐकवण्यात येत असते. जेणेकरून कुराणात नेमके काय सांगितले आहे, ते समजून घेऊन त्याप्रमाणे आचरण करणे सोपे होते. शिवाय कुराणाबद्दल असलेले चुकीचे समजही दूर होत आहेत.
रस्त्यावर नमाज पठणास बंदी
१) इस्लाम धर्मानुसार नमाज पढण्याआधी शरीर स्वच्छ करण्यास सांगितले आहे; मात्र रस्त्यावर नमाज पठण केल्याने रस्त्यावरील अस्वच्छतेमुळे शरीर अस्वच्छ तर होतेच; शिवाय त्यातून संसर्गही होऊ शकतो. इस्लामात मूर्तीपूजा नाही, रस्त्यावर नमाज पठणामुळे त्याचेही पालन होत नाही. यासाठी रस्त्यावर नमाज पठण करण्यास मनाई करण्यात आली आहे.
२) मशिदीबाहेर भोंगे नसल्यामुळे मौलवींचा आवाज बाहेर येत नसल्याने लोक आपोआपाच मशिदीच्या आत नमाज पठण करतात. ईदच्या नमाजासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. लोकांनी रस्त्यावर नमाज पठण करू नये, यासाठी ईदच्या दिवशी तीन वेळा नमाज आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहितीही मुझफ्फर हुसेन यांनी दिली.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..