
बुस्टर घेतलेल्यांना संसर्ग काळजी न करण्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : मुंबईतील बूस्टर डोस घेतलेल्या व्यक्तींमध्ये कोविड-१९ चा संसर्ग मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. मात्र तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार ही सर्व प्रकरणे सौम्य आहेत. त्यामुळे सध्या तरी चिंता न करण्याचे आवाहन केले आहे. गेल्या काही दिवसांत पालिका आणि खासगी अशा दोन्ही रुग्णालयांतील डॉक्टरांना असे सुमारे ४० ते ५० रुग्ण आढळून आले आहेत.
सेव्हन हिल्स रुग्णालयाच्या अतिरिक्त अधिष्ठाता डॉ. स्मिता चव्हाण यांनी सांगितले की, गेल्या दोन महिन्यांत ४ हजार ७६५ नागरिकांना बूस्टर डोस देण्यात आला आहे. त्यापैकी २७ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १९ रुग्णांना एका आठवड्यात, चार जणांना आठ दिवसांत, दोघांना नऊ दिवसांत आणि १० दिवसांत दोघांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. या रुग्णांमध्ये १३ जण २२ ते ४० वयोगटातील होते, १० जण ४१ ते ५९ वयोगटातील होते, तर चार जण ज्येष्ठ नागरिक होते. एका डॉक्टरलाही विषाणूची लागण पुन्हा झाली आहे. नागरिक आता मास्क वापरत नाहीत. कोविड वागणूक पाळत नाहीत. ज्यामुळे संसर्ग पसरत आहे. पुन्हा कोविडचा संसर्ग झाल्यास ७ ते १४ दिवस घरीच राहावे लागणार आहे.
तज्ज्ञांनी सांगितले की, लस रोगाची गुंतागुंत आणि तीव्रता रोखण्यासाठी आहे. त्यांनी मास्क घालण्याच्या आणि कोविड-योग्य वर्तनाचे पालन करण्याच्या गरजेवर जोर दिला, विशेषत: ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि वारंवार प्रवास करणाऱ्यांनी कायम काळजी घेतली पाहिजे, असे सांगितले.
...
मास्क वापरला पाहिजे!
अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, बूस्टर डोस घेतल्यानंतर लोकांना संसर्ग झाल्याची काहीच प्रकरणे नोंदली गेली आहेत. सर्वांत चांगली रोगप्रतिकारकशक्ती असलेल्या व्यक्तीनेही कोविडयोग्य वर्तनाचे पालन करणे आवश्यक आहे. सरकारने मास्कचा अनिवार्य वापर कमी केला असला तरी मास्क वापरला पाहिजे. आज कोविड-१९ अस्तित्वात आहे, पण भविष्यात आणखी काही आजार होऊ शकतो.
...
काळजी करण्याची गरज नाही
बॉम्बे रुग्णालयाचे चेस्ट फिजिशियन डॉ. गौतम भन्साळी म्हणाले, मी १२ ते १३ जणांवर उपचार केले आहेत. बहुतेक रुग्ण हे ५५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत आणि ते वारंवार प्रवास करणारे आहेत. त्यांना ताप आणि अंगदुखी यासारखी सौम्य लक्षणे आहेत आणि त्यापैकी कोणालाही हॉस्पिटलायझेशनची गरज नाही. साध्या औषधोपचाराने ते चार ते पाच दिवसांत बरे होत आहेत. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही.
...
बरेच जण लक्षणे नसलेले...
संसर्गजन्य रोगतज्ज्ञ डॉ. ओम श्रीवास्तव म्हणाले की, हे खरे आहे की बूस्टर डोस घेतल्यानंतरही लोकांना संसर्ग होत आहे, परंतु त्यापैकी बरेच जण लक्षणे नसलेले आहेत आणि त्यांना जेव्हा प्रवास करायचा होता तेव्हा नियमित तपासणी करताना त्यांना संसर्ग झाल्याचे समजले. काही रुग्णांनी डोके आणि शरीर दुखणे नोंदवले आहे; परंतु ही मोठी गंभीर बाब नाही.
...
बुधवारपर्यंत बूस्टर लसीकरण
हेल्थकेअर आणि फ्रंटलाइन कर्मचारी - १, ५९, ८१०
ज्येष्ठ नागरिक - ३, ०१, ७४०
४५ ते ५९ वर्षे वयोगटातील - १९, ८५३
१८ ते ४४ वयोगटातील- २, ३५८
एकूण- ४,८५,२७७
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..