
रायगडची शिवशाही समस्यांच्या गर्तेत
श्रीवर्धन, ता. २४ (बातमीदार) : रायगड जिल्ह्यात प्रवाशांना आरामदायी आणि आल्हाददायी प्रवास करण्यासाठी ‘शिवशाही’ बस सेवा सुरू करण्यात आली. सद्यस्थितीत ही शिवशाही समस्यांच्या गर्तेत सापडली आहे. अनेक बसमधील सीसी टीव्ही बंद अवस्थेत आहेत. आसनांची तर अत्यंत दुरवस्था झालेली आहे. बसमध्ये अस्वच्छता पसरलेली असते. काचांवर तर थुंकल्याचे डाग असतात. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे अग्निरोधक यंत्रणेचाही अभाव आहे. प्रवासादरम्यान दुर्घटना घडल्यास कोणाला जबाबदार धरणार, हा प्रश्नही अनुत्तरित आहे.
खासगी लक्झरी बस सेवेला चपराक बसावी. या बससारख्याच सुविधा एसटीत उपलब्ध असाव्यात. प्रवाशांनी महामंडळाच्याच सेवेचा लाभ घ्यावा, हा मुख्य उद्देश ‘शिवशाही’ बस सुरू करण्यामागचा होता. रायगड जिल्ह्यात ‘शिवशाही’ बस सेवा सुरू केल्यानंतर ती प्रवाशांच्या पसंतीलाही उतरली. मात्र, सद्यस्थितीत शिवशाहीची स्थिती पाहिली तर प्रवासी पुन्हा खासगी लक्झरी बस सेवेला प्राधान्य देतील, असे चित्र निर्माण झाले आहे. बसमधील आसनांची अत्यंत दुरवस्था झालेली आहे. आसनांचे हँडल तुटलेले आहेत. काचेवर थुंकल्याचे डाग, पुशबॅक सुविधेची झालेली दुरवस्था, बसचा खिळखिळे झाल्याचा आवाज, उत्तम शॉक ऑब्झर असल्याचे दावे करूनही बसला हादरे बसत असतात. अशी सध्याच्या ‘शिवशाही’ची स्थिती झालेली आहे. अनेक शिवशाही गाड्यांमध्ये डिजिटल डिस्प्ले, सीसी टीव्ही, प्रथमोपचार पेटी, अग्निरोधक यंत्रणाच नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे, प्रवासादरम्यान एखादा अपघात झाल्यास तत्काळ उपचार मिळत नाही. तसेच, बहुतांश बसमध्ये सीसी टीव्हीच बंद असल्याने एखादी दुर्घटना झाल्यास कोणाला जबाबदार धरणार, याबाबत प्रश्न अनुत्तरित आहेत.
एसटी कर्मचारी कित्येक महिने संपावर असल्याने बस बंद होत्या. त्यात तांत्रिक विभागातील कर्मचारीही संपावर गेल्याने दुरुस्तीची कामे प्रलंबित आहेत. कर्मचारी आता रुजू होत आहेत. त्यामुळे येत्या काळात शिवशाहीसह अन्य बसच्या दुरुस्तीची कामे पूर्ण होतील. याशिवाय, संपूर्ण बसची पूर्वपाहणी आणि स्वच्छता करूनच पुढे पाठवण्यात येतील.
- अनघा बारटक्के, विभाग नियंत्रक, पेण
अनेक बसमधील आसने मोडकळीस आल्या आहेत. आसनेही अस्वच्छ आहेत. मुळातच एसटी पूर्ण स्वच्छ करूनच आगाराबाहेर गेली पाहिजे. शिवशाहीसह साध्या बसमध्येही सुविधा असल्या पाहिजे. जेणेकरून प्रवासी एसटी प्रवासाला प्राधान्य देतील.
- संतोष धुमाळ, एसटी प्रवासी
श्रीवर्धन : शिवशाही बसमधील सीसी टीव्ही बंद आणि साहित्य तुटलेल्या अवस्थेत आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..