
कल्याणमधील महिलेची ७१ लाखाला फसवणूक
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २४ : नवी मुंबई येथील स्मशानभूमीच्या देखभालीच्या निविदेमध्ये भागीदारी करण्याचे व त्यातून मोठा आर्थिक फायदा असल्याचे प्रलोभन दाखवित एका भामट्याने कल्याण येथील महिलेची ७१ लाख १५ हजारांना फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात सोहेल बुरहान (वय २८) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याण पश्चिमेत राहणाऱ्या ५४ वर्षीय महिलेचा वॉटर सप्लायचा व्यवसाय आहे. २०१७ मध्ये त्यांची सोहेल याच्याशी ओळख झाली होती. सोहेलने महिलेचा विश्वास संपादन करून नवी मुंबई महापालिका हद्दीतील स्मशानभूमीच्या देखभालीच्या निविदेमध्ये भागीदार होण्याचे व त्यातून मोठा आर्थिक फायदा कमविण्याचे प्रलोभन त्यांना दाखविले. त्याला बळी पडत महिलेने २०१७ ते २०१९ या कालावधीत सोहेलला टेंडर मिळवून देण्यासाठी ७१ लाख रुपयांची मदत केली. या कामाचे टेंडर मिळाले नाही, तसेच दिलेली रक्कम सोहेलने परत न केल्याने महिलेने त्याच्याविरोधात बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..