प्रशिक्षणार्थी सुरक्षा रक्षकांचे आमरण उपोषण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रशिक्षणार्थी सुरक्षा रक्षकांचे आमरण उपोषण
प्रशिक्षणार्थी सुरक्षा रक्षकांचे आमरण उपोषण

प्रशिक्षणार्थी सुरक्षा रक्षकांचे आमरण उपोषण

sakal_logo
By

अलिबाग, ता. ५ (बातमीदार) ः सुरक्षा रक्षक मंडळामार्फत शासकीय कार्यालयात नोकरीचे प्रलोभन दाखवून हजारो तरुणांची भरती करण्यात आली. त्यांना प्रशिक्षणही देण्यात आले. मात्र चार वर्षांपासून हजारो तरुण नोकरीच्या प्रतीक्षेत आहे. संबंधित विभागातील प्रमुखांशी चर्चा करूनही समाधानकारक उत्तर मिळत नसल्‍याने संतप्त प्रशिक्षणार्थी सुरक्षा रक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. न्याय न मिळाल्यास आत्मदहन करणार असल्‍याचा इशारा देण्यात आला आहे.
सुरक्षा रक्षक मंडळाच्या माध्यमातून शासकीय कार्यालयात २०१९ पूर्वी एक हजार उमेदवारांची भरती करण्यात आली होती. मंडळाने सुमारे तीन हजार उमेदवारांची चाचणी घेतली. भरतीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांसह मैदानी चाचणी घेत उमेदवारांची यादी तयार केली. मात्र मंडळाकडून मोजक्याच उमेदवारांना सरकारी कार्यालयात सुरक्षा रक्षक म्हणून रुजू करून घेतले. उर्वरित दोन हजार ८०० प्रशिक्षणार्थी सुरक्षा रक्षक प्रतीक्षेत राहिले. नोकरी मिळेल या आशेवर प्रशिक्षणार्थी सुरक्षा रक्षकांनी जवळपास चार वर्षे वाट पाहत आहेत. वारंवार विचारणा करूनही नोकरीत रुजू करण्यात न आल्‍याने सुरक्षा रक्षकांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.

बंद कंपनीत रुजू होण्याचे आदेश
सुरक्षा रक्षक म्हणून नोकरीला लावण्यासाठी प्रशिक्षणार्थी सुरक्षा रक्षकांना सुरक्षा मंडळाकडून संदेश पाठविण्यात आले. त्यानुसार संबंधित कंपनी, सरकारी कार्यालयात गेल्यावर जागाच उपलब्ध नसल्याचे दिसून आले. खालापूर येथील ज्योती फार्म, प्रॉडक्स कंपनी बंद असताना त्या ठिकाणी कामावर रुजू होण्याचे संदेश देण्यात आले. सुरक्षा रक्षक मंडळाच्या या प्रकारामुळे फसवणूक झाल्याचा आरोप प्रशिक्षणार्थी सुरक्षा रक्षकांनी केला आहे.

नोकरीपायी दागिने गहाण
जेएसडब्ल्यू कंपनीत सुपरवायझर होतो. सुरक्षा रक्षक मंडळामार्फत नोकरी मिळावी यासाठी प्रयत्‍न करीत होतो. मंडळाकडून सिडकोमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून रुजू होण्याचा मेसेज आला. त्‍यामुळे जेएसडब्ल्यूची नोकरी सोडून त्या ठिकाणी गेलो. मात्र जागाच उपलब्ध कळले. या प्रकारामुळे आर्थिक नुकसान झाले आहे. अनेकांनी नोकरी मिळेल या आशेने घरातील दागिने गहाण ठेवले आहेत. मात्र अद्याप एकालाही नोकरी मिळाली नसल्‍याची माहिती एका प्रशिक्षणार्थी सुरक्षा रक्षकाने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.

२०१९ ला सुरक्षा रक्षकाची भरती करण्यात आली. मैदानी चाचणीसह लागणारी सर्व परीक्षा घेण्यात आल्‍या. त्यात अनेकांच्या नावांची यादी प्रसिद्ध केली. परंतु काहींचे नाव मागे असतानाही त्यांना नोकरी देण्यात आली. नोकरी नसल्याने मोठी आर्थिक हानी झाली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे. हा लढा शेवटपर्यंत सुरू ठेवणार आहे.
- रवींद्र भले, संस्थापक,
महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक हक्क संघटना


जाहिरातीमध्ये नोकरीची हमी नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. जशी मागणी आस्थापनांकडून येते, त्याप्रमाणे सुरक्षा रक्षक म्हणून नियुक्त केले जातात. ज्या आस्थापनांनी सुरक्षा रक्षकांना रुजू केले नाही, त्यांच्याविरोधात खटले दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
- स्नेहल माटे, सचिव
रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ