पर्यावरणपूरक मकर संक्रांत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पर्यावरणपूरक मकर संक्रांत
पर्यावरणपूरक मकर संक्रांत

पर्यावरणपूरक मकर संक्रांत

sakal_logo
By

अमित गवळे, पाली
मकर संक्रांतीनिमित्त ठिकठिकाणी हळदी-कुंकू कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या वेळी महिलांची ओटी भरून त्यांना वाण देण्याची प्रथा आहे. यात अनेकदा प्लास्टिकच्या वस्तूंचे वाण वाटप केले जाते. मात्र काही सुज्ञ महिलांनी पर्यावरण पूरक हळदीकुंकू साजरा करण्यावर भर दिला आहेत. ‘प्लास्टिक सोडा, कापडी-ज्यूटच्या पिशवीशी नाते जोडा’ असा संदेश देण्याची तयारी सुरू आहे.
दोन वर्षे कोरोनामुळे अनेक महिलांनी हळदीकुंकू कार्यक्रम केलाच नाही. मात्र यंदा कोणतेच निर्बंध नसल्याने हळदीकुंकू उत्‍साहात साजरे करण्याचे नियोजन सुरू आहे. अनेक गृहिणी, महिला मंडळे व राजकीय पक्ष यासाठी सज्ज झाले आहेत. माणगाव तालुक्यातील विळे येथील गृहिणी स्वाती मुंडे यांनी हळदीकुंकू पर्यावरणस्नेही पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या कापडी-ज्यूटच्या पिशव्या वाण म्हणून देणार आहेत.
दोन वर्षांपूर्वी सुधागड तालुक्यातील पायरीची वाडी शाळेत आयोजित हळदी कुंकू कार्यक्रमात महिलांना छानसे रोप व कापडी पिशव्या वाटप करत अनोखा व विधायक पर्यावरणपूरक हळदी-कुंकू समारंभ साजरा करण्यात आला होता. तत्कालीन मुख्याध्यापक कुणाल पवार यांनी हा उपक्रम राबविला होता.

उत्तम पर्याय
बाजारात कोणत्याही छोट्या मोठ्या वस्तू खरेदी केल्या की आपसूकच दुकानदार प्लास्टिकची पिशवी देतो किंवा ती आवर्जून मागितली जाते. परिणामी मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचा ऱ्हास होतो. तसेच वाण म्हणून मिळणारी वस्तू कोणाची मोठी व चांगली आहे, यासाठीही महिलांमध्ये जणू स्‍पर्धाच पाहायला मिळते. प्लास्टिकच्या वस्तू तुलनेने स्वस्त आणि हव्या तितक्‍या मिळत असल्‍याने महिलांचाही त्या खरेदीकडे ओढा असतो. त्यामुळे सर्वांना प्लास्टिक वस्तू व पिशवीला पर्याय स्‍वीकारणे आवश्यक आहे. त्यासाठी कापडी व ज्यूटच्या पिशव्या उत्तम पर्याय आहे. यामुळे पर्यावरणाच्या ऱ्हास कारणीभूत ठरणाऱ्या प्लास्‍टिकचा वापर आपोआपच कमी होईल.

भारतीय सण आणि निसर्ग यांचे अतूट आहे. यासाठी छोटेसे पाऊल उचलले आहे. हळदीकुंकू कार्यक्रमाला वाण म्हणून ज्यूटच्या आकर्षक पिशव्या वाटणार आहे. आठवडा बाजारातून त्यांची आगाऊ खरेदी केली आहे. या पर्यावरण स्नेही पिशव्या किमान १५ ते २० घरात जाणार आहेत आणि प्रत्येक घरातील व्यक्ती या पिशव्यांचा वापर करतील आणि प्लास्टिक पिशवीचा वापर आपोआप कमी होण्यास मदत होईल.
स्वाती राम मुंडे, गृहिणी, विळे

पर्यावरण स्नेही ज्यूटच्या रंगीबेरंगी, नक्षीकाम असलेल्या आकर्षक, स्वस्त व टिकाऊ पिशव्या खरंच उपयुक्त आहेत. आकारावरून अगदी ५० रुपयांपासून पुढे मिळतात. विशेष म्हणजे बाजारात त्या सहज उपलब्ध होत आहेत. संक्रांतीच्या निमित्ताने कुटुंबातील सदस्य व मित्रपरिवाराला भेट म्हणून देत आहे.
सीमा रत्नदीप वाघपंजे, शिक्षिका, श्रीवर्धन

पाली ः वाण म्‍हणून ज्यूटच्या पिशव्यांचे वाटप होणार आहे.