पाणी, वाहतुकीचा तिढा सोडवणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाणी, वाहतुकीचा तिढा सोडवणार
पाणी, वाहतुकीचा तिढा सोडवणार

पाणी, वाहतुकीचा तिढा सोडवणार

sakal_logo
By

पाली, ता. ९ (वार्ताहर) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पालीतील वर्षानुवर्ष प्रलंबित शुद्ध पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, तसेच वाहतूक कोंडीचा तिढा कायमचा सोडवण्यासाठी बलाप- झाप बाह्यवळण मार्ग जलदतेने व्हावा यासाठी प्रयत्न करू, असे आश्‍वासन आमदार महेंद्र दळवी यांनी दिले. तसेच सरकार गोरगरीब जनतेच्या हितासाठी काम करत असून कुठेही विकासनिधीची कमतरता भासणार नाही, अशी ग्वाहीही दळवी यांनी दिली.
पाली-सुधागड तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांचा सत्कार समारंभ होता. त्या वेळी दळवी बोलत होते. या वेळी दळवी यांनी सुधागडवासीयांना विकासाचा शब्द दिला. जिल्ह्यासह सुधागड तालुक्यात शिंदे गटाने मुसंडी घेत अनेक ग्रामपंचायतीत एकहाती सत्ता काबीज केली आहे. तालुक्यातील हातोंड, घोटवडे, चिवे, खांडपोली, ताडगाव व निगडे या पाच ग्रामपंचायतींवर विजयाचा झेंडा दिमाखात रोवला आहे. येथील नवनिर्वाचित सरपंच, सदस्यांचा पाली भक्तनिवास क्रमांक १ मध्ये आमदार महेंद्र दळवी, जिल्हाप्रमुख राजा केणी, जिल्हा संपर्कप्रमुख प्रकाश देसाई, रवींद्र देशमुख व अन्य मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी वाद्यवृंद व घोषणांच्या गजरात पाली शहरातून भव्य रॅली काढण्यात आली होती. याप्रसंगी सुधागडात लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटाच्या १० हजार कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा घेणार असल्याचा निर्धार जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश देसाई यांनी केला.
राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाने देशातून शिवसेना संपवण्यासाठी कायम प्रयत्न केले. मात्र, तथाकथित मंडळींनी त्या पक्षाशी महाविकास आघाडी अशी अभद्र युती केली. हे सर्वसामान्य शिवसैनिकाला रुचले नाही, अशी खोचक टीका प्रकाश देसाई यांनी केली. या वेळी संजय जांभळे, अनुपम कुलकर्णी, संजय म्हात्रे, ॲड. मनोज शिंदे आदींसह मान्यवर, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संजय राऊत यांच्यावर टीका
आमदार महेंद्र दळवी यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर टिकास्त्र सोडले. संजय राऊत यांचा तमाशातील कलाकार असा उल्लेख करत ज्याला ग्रामपंचायत निवडून आणण्याची लायकी नाही, अशा माणसाच्या वक्तव्याची दखल काय घ्यायची, अशी खिल्ली उडवली. तसेच हे सरकार पाच वर्षे टिकेल, असा विश्वासही त्‍यांनी व्यक्त केला. राऊत यांच्यामुळेच ४० आमदार बाहेर पडले. राऊत यांच्यावर अधिक बोलण्यात अर्थ नाही.