
‘पाटणूस’ शहीद जवानांचे गाव
अमित गवळे, पाली
जगाच्या इतिहासात १९१४ ते १९१८ या दरम्यान झालेले पहिले महायुद्ध खूप प्रभावशाली ठरले. त्या वेळी ब्रिटिशांकडून लाखो भारतीयांनी युद्धात सहभागी होऊन आपला पराक्रम दाखवला होता. रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यामधील पाटणूस या छोट्या गावातील काही सैनिकही या युद्धात सहभागी झाले होते. त्यातील ४५ जणांना वीरमरण आले. त्यांच्या स्मरणार्थ ब्रिटिश सरकारने गावात स्मृतिस्तंभ उभारला. हा स्तंभ गावाची एक वेगळी ओळख जोपासत आहे.
------------------
पाटणूस ग्रामपंचायत व कुंडलिका विद्यालयाच्या परिसरामध्ये हे स्मृतिस्तंभ आहे. त्यावर पांढऱ्या संगमरवरावर इंग्रजीमध्ये स्पष्टपणे कोरून लिहिलेले आहे. पाटणूस गावातील ४५ जण १९१४ ते १९१९ या दरम्यान पहिल्या युद्धात लढण्यास गेली होती. या शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पाटणूस गावकऱ्यांसह सरपंच व ग्रामपंचायतीमार्फत दर २६ जानेवारी व १५ ऑगस्टला स्मृतिस्तंभ सजवून त्यांना मानवंदना दिली जाते. या शहीद व स्मृतिस्तंभाची दखल ग्रामपंचायतीकडून घेतली जाते. स्मृतिस्तंभाच्या भोवती सुशोभीकरणही करण्यात आले आहे, अशी माहिती पाटणूस ग्रामपंचायत माजी उपसरपंच आदेश दळवी यांनी दिली. मात्र, हे ४५ हुतात्मे कोण होते, याची कोणालाही माहिती नाही. सरकार दरबारीही याची नोंद दिसत नाही.
महायुद्धात लाखो जवान शहीद
पहिले महायुद्ध हे जागतिक युद्ध होते. हे युद्ध मुख्यतः युरोपातील दोस्त राष्ट्रे (फ्रान्स, रशियन साम्राज्य, यूके/ब्रिटन व इटली आणि अमेरिकेची संस्थाने) आणि केंद्रवर्ती सत्ता (ऑस्ट्रिया-हंगेरी, प्रशिया/जर्मनी, बल्गेरिया, ओस्मानी साम्राज्य) यांच्यात झाले. यात दोस्त राष्ट्रांचा विजय झाला. त्यामध्ये लाखो लोकांचा नरसंहार झाला.
भारतीयांचा सहभाग
युरोपसह आशिया, आफ्रिका, अमेरिका या खंडात; तसेच प्रशांत महासागरात पहिले महायुद्ध लढले गेले. यामध्ये भारतातील दीड लाखाहून अधिक प्रशिक्षित जवान लाखो स्वयंसेवक ब्रिटिशांच्या बाजूने सहभागी झाले होते. यामध्ये ७४ हजार १८७ भारतीय जवान शहीद झाले. तर ६७ हजारांहून अधिक भारतीय जखमी झाले.